कल्याणमध्ये तीन दिवसांपूर्वी झालेल्या विवाहित महिलेच्या हत्येचं गुढ उकललं आहे. हत्येमागेचं धक्कादायक कारण देखील पोलीस तपासात समोर आलं आहे. कल्याण पश्चिमेकडील पारेकरवाडी परिसरात असलेल्या रचना रॉयल इमारतीमध्ये ही हत्येची घटना घडली होती. मुलीने आंतरजातीय प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून पोटच्या मुलीची पित्यानेच निर्घृण हत्या केली होती. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे.
दोन साखरपुडे नाकारून केला होता विवाह
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत गायत्रीने काही महिन्यांपूर्वी कुटुंबाच्या संमतीशिवाय आणि इच्छेविरुद्ध जाऊन दुसऱ्या जातीतील एका तरुणाशी प्रेमविवाह केला होता. गायत्रीचे लग्न जमवण्यासाठी तिचे वडील विनोद वसईकर यांनी दोन वेळा वेगवेगळ्या ठिकाणी साखरपुड्याची पूर्ण तयारी केली होती. मात्र, गायत्रीने वडिलांचे ते दोन्ही मुलांना नकार देत आपल्या प्रियकराशी लग्न केले होते. लग्नानंतर गायत्री काही दिवसांपूर्वीच पारेकरवाडी येथील आपल्या माहेरी आली होती. मात्र, तिच्या आंतरजातीय लग्नाचा राग विनोद वसईकर यांच्या मनात धुमसत होता.
(नक्की वाचा- Riyan Angry on V. Sooryavanshi: 96 धावा करणाऱ्या वैभवला रियानने झापलं? RR चा कर्णधार ट्रोलर्सच्या निशाण्यावर)
दुपारच्या जेवणानंतर वाद विकोपाला गेला
घटनेच्या दिवशी दुपारचे जेवण झाल्यानंतर वडील विनोद आणि मुलगी गायत्री यांच्यात लग्नाच्या याच विषयावरून पुन्हा एकदा जोरदार खडाजंगी झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की, संतापाच्या भरात विनोद वसईकर यांनी घरात असलेल्या धारदार शस्त्राने गायत्रीवर सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या गायत्रीचा रक्तबंबाळ अवस्थेत जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
आपल्याच मुलीचा जीव घेतल्यानंतर विनोद वसईकर घटनास्थळावरून फरार झाला होता. बाजारपेठ पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत गुप्त माहितीच्या आधारे शोधमोहीम राबवली. अखेर तीन दिवसांनंतर आरोपी विनोद वसईकर याला ताब्यात घेतले.
(नक्की वाचा- Pune Liquor Tragedy: विषारी दारू प्रकरणी मोठी कारवाई, 9 पोलीस अधिकारी निलंबित, नावे आली समोर)
चौकशीदरम्यान, त्याने आंतरजातीय विवाहाच्या रागातूनच मुलीची हत्या केल्याची गुन्ह्याची कबुली दिली आहे. बाजारपेठ पोलीस या प्रकरणाचा पुढील कायदेशीर तपास करत असून, आरोपी विनोद वसईकर याला आज दुपारी कल्याण न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.