Kalyan News : कल्याणमध्ये अडीच वर्षाच्या मुलाच्या कमरेत राहिली इंजेक्शनची सुई; एक्स-रे काढताच आई-वडील हादरले

Kalyan News : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्य रुग्णालयात उपचारादरम्यान वैद्यकीय निष्काळजीपणाचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Kalyan News : डॉक्टरांनी एक्स-रे काढल्यानंतर सुई कमरेतच अडकल्याचे स्पष्ट झाले.
कल्याण:

Kalyan News : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्य रुग्णालयात उपचारादरम्यान वैद्यकीय निष्काळजीपणाचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कुत्र्याने चावा घेतलेल्या अवघ्या अडीच वर्षांच्या चिमुरड्याला रेबीज प्रतिबंधक इंजेक्शन देताना तुटलेली सुई थेट त्याच्या कमरेतच अडकून राहिली. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केले, मात्र मुलाला असह्य वेदना होऊ लागल्याने पालकांनी त्याचा एक्स-रे काढला आणि या भयंकर प्रकाराचा खुलासा झाला.

काय आहे प्रकरण?

कल्याण पूर्व येथील काका ढाबा परिसरात राहणारे सूर्यभान पांडे आणि त्यांची पत्नी काजल पांडे यांच्या अडीच वर्षांच्या कावेश या मुलाला एका पाळीव कुत्र्याने चावा घेतला होता. त्यामुळे त्याला उपचारासाठी केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे ड्यूटीवर असलेल्या डॉक्टरांनी आणि कर्मचाऱ्यांनी त्याला रेबीज प्रतिबंधक इंजेक्शन दिले.

Advertisement

मात्र, इंजेक्शन दिल्यानंतर त्याची सुई तुटून चिमुरड्याच्या कमरेतच राहिल्यास पालकांच्या लक्षात आले.

( नक्की वाचा : Dombivli News: डोंबिवलीत आणखी एक मोठा घोटाळा! 14 मजल्यांच्या नावाखाली बिल्डरने उभारली 21 मजली इमारत )

डॉक्टरांनी काय दिलं उत्तर?

मुलाच्या आई काजल पांडे यांनी सुई तुटल्याचा संशय व्यक्त करत रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना विचारणा केली. मात्र, सुई कुठे तरी खाली पडली असेल असे सांगत डॉक्टरांनी त्यांना मुलाला घरी घेऊन जाण्यास सांगितले. घरी गेल्यावर काही वेळातच मुलाला तीव्र त्रास होऊ लागला आणि तो प्रचंड रडू लागला.

पालकांनी तात्काळ मुलाला घेऊन मुंबईतील सायन रुग्णालयात धाव घेतली, मात्र तिथे उपचारास नकार मिळाल्याने शेवटी त्यांनी मुलाला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी एक्स-रे काढल्यानंतर सुई कमरेतच अडकल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर शस्त्रक्रिया करून मुलाच्या कमरेतून ती सुई बाहेर काढण्यात आली.

( नक्की वाचा : Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफीतून 94 हजार नावे वगळली; तुमचं नाव यादीत आहे का? 'या' पद्धतीनं करा चेक )

दोषींवर कारवाईची मागणी

आमच्या मुलासोबत जो भयंकर प्रकार घडला, तो इतर कोणत्याही निष्पाप बालकासोबत घडायला नको, अशी उद्विग्न प्रतिक्रिया मुलाच्या आई-वडिलांनी दिली आहे. या घटनेनंतर रुक्मिणीबाई रुग्णालयातील भोंगळ कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी अमित कोलेकर यांनी या घटनेची गंभीर दखल घेत रुग्णालयातील जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या संपूर्ण प्रकरणावर रुक्मिणीबाई रुग्णालय प्रशासन किंवा केडीएमसीकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
 

Advertisement

Topics mentioned in this article