Kalyan News: काही दिवसांपूर्वी अचानक गायब झालेल्या एका महिला शिक्षिकेच्या प्रकरणाने कल्याण शहर हादरले होते. शाळेत जाते सांगून निघालेली महिला थेट घरी परतलीच नाही. नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली, शोध सुरू झाला अन् चार दिवसांनी घोटी परिसरातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली. या शिक्षिकेचा मृतदेहच सापडला. सुरुवातीला गूढ वाटणाऱ्या या प्रकरणाचा शोध घेतला असता, अत्यंत जवळच्या व्यक्तीनेच हा काटा काढल्याचे उघड झाले आहे.
काय आहे प्रकरण?
कल्याण पश्चिमेतील मोरे परिसरात राहणाऱ्या शिक्षिका संगीता चंदनशिवे 14 जुलै रोजी नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी घरातून बाहेर पडल्या. आसनगाव येथे एलआयसीच्या काही कामानिमित्त जायचे असल्याचे त्यांनी नातेवाईकांना सांगितले होते. मात्र, रात्र झाली तरी त्या घरी परतल्याच नाहीत. घाबरलेल्या कुटुंबीयांनी तात्काळ कोळसेवाडी पोलीस ठाणे गाठून त्या बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली.
कोळसेवाडी पोलीस आणि कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला. शिक्षिकेचा शोध सुरू असतानाच चार दिवसांनी घोटी परिसरातील एका रुग्णालयाजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे बेपत्ता झाल्याच्या तक्रारीला हत्येचे भयानक वळण मिळाले. तपासादरम्यान पोलिसांना एक महत्त्वाचा सुगावा लागला. मृत शिक्षिकेच्या एटीएम कार्डचा वापर करून घोटी भागात पैसे काढण्यात आले होते. पोलिसांनी तत्परतेने एटीएम केंद्रातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांची ओळख पटवली.
( नक्की वाचा : Badlapur News: साडी आणून दिली नाही म्हणून डोक्यात कुकर मारून पतीला संपवलं; गुन्हा पचला होता पण... )
काय आहे हत्येचं कारण?
पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवल्यानंतर गोकुळ आव्हाड या मुख्य सूत्रधाराचे नाव समोर आले. संगीता आणि गोकुळ यांच्यात अनेक वर्षांपासून जवळची मैत्री होती. मात्र, संगीता यांच्या नावावर असलेली मालमत्ता स्वतःच्या नावे करण्यासाठी गोकुळ सातत्याने त्यांच्याकडे तगादा लावत होता. संगीता यांनी या मालमत्तेचा हक्क देण्यास ठाम नकार दिल्याने, संतप्त झालेल्या गोकुळने आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने त्यांच्या हत्येचा कट रचला.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, गोकुळ आव्हाड याने त्याचे साथीदार तुषार पारखे, विनोद पांडे आणि संतोष जाधव यांच्या मदतीने संगीता यांना विश्वासात घेतले. कामानिमित्त त्यांना घोटी परिसरात नेण्यात आले आणि तिथेच असहाय्य अवस्थेत त्यांचा गळा आवळून निर्घृण खून करण्यात आला.
या भयानक गुन्ह्याचा पर्दाफाश करत कल्याण गुन्हे शाखेने धडक कारवाई केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत, तर तिसऱ्या आरोपीला घोटी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. फरार असलेल्या एका उर्वरित आरोपीचा पोलीस सध्या शोध घेत आहेत.