रिझवान शेख
डॉक्टर आणि नर्सना मारहाण केल्या प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचा नगरसेवक रमेश म्हात्रे सध्या जेलची हवा खात आहे. पण जेलमध्ये या मारकुट्या भाईची हवा टाईट झाली आहे. काही दिवसातच त्याने गयावया करायला सुरूवात केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सुमोटो दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी वेळी त्याने अक्षरश: गयावया केली. मला जिल्ह्यातून हाकलून द्या, तडीपार करा पण जेलमधून बाहेर काढा असं त्याने उच्च न्यायालयात सुनावणी वेळी सांगितलं.
रमेश म्हात्रेला सुरूवातीला जामीन मंजूर झाला होता. मात्र त्याचा हा जामीन रद्द करण्यात आला. त्याची रवानगी कल्याणच्या आधारवाडी जेलमध्ये झाली. मात्र तिथे त्याची स्थिती वाईट झाली आहे. त्यामुळेच त्याने कोर्टासमोर गयावया केली. 'मला जिल्ह्यातूनच काय,राज्यातून तडीपार करा, पण मला कारागृहाबाहेर काढा', अशी विनंत नगरसेवक रमेश म्हात्नेने कोर्टासमोर केली आहे. हायकोर्टाने सुमोटो याचिका दाखल केली होती. त्यावर सोमवारी सुनावणी झाली. त्यावेळी त्याने ही विनंती केली.
मात्र हायकोर्टाने या सुमोटो याचिकेवरील सुनावणी शुक्रवारपर्यंत तहकूब केली आहे. त्यामुळे मारकुट्या रमेश म्हात्रेचा मुक्काम आधारवाडी कारगृहातच राहणार आहे. त्याला कोणताही दिलासा कोर्टाने दिला नाही. शिवाय कल्याण पालिका रूग्णायलातील मारहाण प्रकरणाचा तपास कल्याण झोन-3 च्या पोलीस उपायुक्तांकडे सोपवण्याचे हायकोर्टाचे निर्देश दिले आहेत. रमेश म्हात्रे सध्या जिथं आहेत तिथंच त्यांना राहु द्या असं मागिल सुनावणी वेळी हाय कोर्टाने सांगितले होते. सोमवारी तरी आपल्याला दिलासा मिळेल असं त्याला वाटलं होतं. पण कोणताही दिलासा हायकोर्टाने दिला नाही.
मागिल सुनावणी वेळी कोर्टाने रमेश म्हात्रेबाबत कडक शब्द वापरले होते. रमेश म्हात्रे यांचा सीसीटीव्हीतील रौद्र अवतार पाहून ते जराही आजारी वाटत नाहीत. त्यामुळे त्यांना थोडे दिवस जेलमध्येच राहू द्या, असं कोर्टाने स्पष्ट केलं होतं. रमेश म्हात्रेनं आपली तब्बेत ठिक नसल्याचं सांगितलं होतं. केडीएमसी आयुक्तांना ही नोटीस जारी करण्यात आली होती. 'तुमच्या रूग्णालयातील डॉक्टरांना मारहाण होऊनही पालिका प्रशासनाच्यावतीनं पोलिसांत तक्रार का दिली गेली नाही?", असा सवाल कोर्टाने केला होता. शिवाय महापालिका प्रशासनाला आपली भूमीका स्पष्ट करायला सांगितली होती. रमेश म्हात्रेने डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि नर्सला मारहाण केली होती. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. माध्यमांनी हा विषय लावून धरल्यानंतर त्याच्यावर कारवाई झाली होती. मात्र त्यानंतर ही त्याला जामीन मंजूर झाला होता. तो जामीन पुढे रद्द करण्यात आला.