अमजद खान
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या भोंगळ कारभारभाराने कळस गाठला आहे. पावसाळा सुरु झाल्यावर केडीएमसी मुख्यालयाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात ड्रेनेज तुंबल्याने रस्त्यावरुन घाण पाणी वाहत आहे. तसेच ड्रेनेज लाईनच्या मेन होलवरी झाकण तुटले आहे. त्याठिकाणी दुर्घटना कधीही होऊ शकते. इतकेच नाही ड्रेनेजचे घाण पाणी रस्त्यावर आणि चौकात पसरले आहे. त्यामुळे पादचारी, नागरीक आणि व्यापारी वर्गास त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
केडीएमसी मुख्यालयाच्या हाकेच्या अंतरावर ही परिस्थिती आहे. तर शहराच्या अन्य ठिकाणी काय स्थिती असेल ? असा संतप्त सवाल नागरीकांनी उपस्थित केला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेकडून ड्रनेज लाईनच्या सफाई यांत्रिक पद्धतीने करण्यासाठी महापालिकेने यापूर्वी एका कंपनीला 22 कोटीचे टेंडर दिले होते. त्याची तीन वर्षाची मुदत संपल्यावर पुन्हा महापालिकेने एका नव्या कंत्राटदाराला काम दिले होते. मात्र या कंपनीला दिलेल्या कंत्राटामध्ये त्रूटी असल्याने नव्याने दिलेले कंत्राट रद्द करण्यात आले.
आत्ता पुन्हा नव्याने प्रक्रिया राबवून नवा कंत्राटदार नेमण्याची प्रक्रिया सुरु आहे. ड्रेनेज लाईन संदर्भात सत्ताधारी पक्षाच्या माजी नगरसेवकांनी मागच्या महिन्यात केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेतली होती. त्योवळी महापालिका आयुक्तांनी ड्रेनेज लाईन संदर्भात 40 टक्के तक्रारी येतात. त्यापैकी बहुतांश तक्रारींचे निवारण केले जाते. त्यापैकी बहुतांश तक्रारी निकाली काढल्या आहेत असे स्पष्ट केले होते. तरी देखील पुन्हा महापालिकेच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात ड्रेनेज लाईनवरील झाकण तुटले.
Saiyaara Box Office: सैयाराने रचला इतिहास, कोणत्याही स्टार किडची सर्वात मोठी ओपनिंग, केले 7 रेकॉर्ड
तुटलेल्या ड्रेनेज लाईनमधून घाण पाणी वाहू लागले. याच रस्त्यावर महापालिकेतील अधिकारी महापालिका मुख्यालयात येतात. त्यांच्या निदर्शनास ही बाब येत नाही का असा सवाल संतप्त नागरीकांनी उपस्थित केला आहे. या ठिकाणच्या एका व्यापाऱ्याला डेंग्यूची लागणही झाली होती. या सगळ्या प्रकाराची आयुक्त कशा प्रकारे दखल घेतात आणि संबंधितांच्या विरोधात काय कारवाई करतात याकडे नागरीकांचे लक्ष लागले आहे.