Kalyan News :परीक्षा संपली अन् 2 दिवसात नियम बदलला; कल्याण डोंबिवलीच्या 3000 विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार?

Kalyan Engineering Students: परीक्षा झाल्यानंतर अचानक बदललेल्या नियमांमुळे कल्याण - डोंबिवली परिसरातील इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसमोर मोठे शैक्षणिक संकट उभे राहिले आहे

जाहिरात
Read Time: 2 mins
Kalyan Engineering Students: मुंबई विद्यापीठानं परीक्षा संपल्यानंतर दोन दिवसांनीच नियम बदलला.
कल्याण:

Kalyan Engineering Students: परीक्षा झाल्यानंतर अचानक बदललेल्या नियमांमुळे कल्याण - डोंबिवली परिसरातील इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसमोर मोठे शैक्षणिक संकट उभे राहिले आहे. मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या या निर्णयाचा फटका सुमारे 3000 विद्यार्थ्यांना बसलाय. त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी अर्थात एनईपीनुसार परीक्षा दिल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच पास होण्याचे निकष बदलण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

कोणता नियम बदलला?

कल्याण आणि आसपासच्या परिसरातील इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी 26 मे 2025 रोजी एनईपी धोरणानुसार त्यांची परीक्षा दिली होती. मात्र, ही परीक्षा संपल्यानंतर अवघ्या दोन दिवसांनी म्हणजेच 28 मे 2025 रोजी विद्यापीठाने उत्तीर्ण होण्याचे निकष बदलले. यापूर्वी अंमलात असलेला पाच अधिक तीनचा निकष बदलून त्याऐवजी क्रेडिट स्कोअरची पद्धत लागू करण्यात आली.

विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांनी परीक्षा पूर्ण केल्यानंतर हा बदल कळवण्यात आल्यामुळे त्यांना नवीन नियमानुसार तयारी करण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. या तांत्रिक बदलामुळे अनेक विद्यार्थी नवीन निकषात बसू शकले नाहीत आणि त्यांना दुसऱ्या वर्षासाठी प्रवेश मिळणे कठीण झाले आहे.

(नक्की वाचा : Dombivli News: कल्याण डोंबिवली महापालिकेचा आणखी एक घोटाळा, जेलमध्ये हवा खाणाऱ्या कर्मचाऱ्याला 40 दिवस पगार )

3000 विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला

या नवीन नियमाचा सर्वाधिक फटका बसलेले सुमारे 3000 विद्यार्थी सप्टेंबर महिन्यापासून दुसऱ्या वर्षाच्या प्रवेशासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, अद्याप त्यांना प्रवेश मिळालेला नाही. विद्यार्थी शाश्वत लोखंडे याने दिलेल्या माहितीनुसार, परीक्षेचा निकाल आणि बदललेले नियम यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

Advertisement

यासंदर्भात मार्च महिन्यात एक महत्त्वाची बैठक होणार असून, त्यानंतर अधिकृत शासन निर्णय (जीआर) निघण्याची शक्यता आहे. तोपर्यंत या विद्यार्थ्यांना प्रोव्हिजनल म्हणजेच तात्पुरता प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी आता जोर धरत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे चालू शैक्षणिक वर्ष वाचू शकणार आहे.


( नक्की वाचा : Dombivli : भाजपा नेत्यावरील हल्ला प्रकरणात डोंबिवलीच्या माजी नगरसेवकांना मोठा दिलासा, वाचा कोर्टात काय घडलं? )

पुढे काय होणार?

आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हताश झालेल्या विद्यार्थ्यांनी बुधवारी सिनेट सदस्य अल्पेश भोईर यांची भेट घेतली. विद्यार्थ्यांनी त्यांना एक सविस्तर निवेदन दिले असून विद्यापीठासोबत आतापर्यंत केलेल्या पत्रव्यवहाराची कागदपत्रेही सोपवली आहेत. विद्यार्थ्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर अल्पेश भोईर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. 

Advertisement

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ते उद्या (गुरुवार, 12 फेब्रुवारी) मुंबई विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूंची भेट घेणार आहेत. या भेटीत विद्यार्थ्यांच्या प्रोव्हिजनल प्रवेशाचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल, जेणेकरून जीआर निघेपर्यंत विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहू शकेल.
 

Topics mentioned in this article