जाहिरात

Dombivli News: कल्याण डोंबिवली महापालिकेचा आणखी एक घोटाळा, जेलमध्ये हवा खाणाऱ्या कर्मचाऱ्याला 40 दिवस पगार

KDMC Salary Scandal: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय एका खळबळजनक प्रकरणाने संपूर्ण प्रशासन हादरले आहे.

Dombivli News: कल्याण डोंबिवली महापालिकेचा आणखी एक घोटाळा, जेलमध्ये हवा खाणाऱ्या कर्मचाऱ्याला 40 दिवस पगार
KDMC Salary Scandal: या गंभीर प्रकरणाने पोलीस आणि महापालिका या दोन्ही यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
डोंबिवली:

KDMC Salary Scandal: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय एका खळबळजनक प्रकरणाने संपूर्ण प्रशासन हादरले आहे. बलात्काराच्या आरोपाखाली जेलमध्ये असलेल्या एका कर्मचाऱ्याला चक्क महापालिकेकडून पगार दिला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे ही व्यक्ती केडीएमसीचा कर्मचारी असल्याची माहिती पोलिसांना तब्बल 6 महिन्यांनंतर समजली आहे. या गंभीर प्रकरणाने पोलीस आणि महापालिका या दोन्ही यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

काय आहे प्रकरण?

डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्यात 3 मे 2025 रोजी स्वप्नील जोशी नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या व्यक्तीवर एका तरुणीला आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचा गंभीर आरोप होता. 

पोलिसांनी या प्रकरणात बीएनएस 64 (2), बीएनएस 69, 115 (2) आणि 352 या कलमान्वये कारवाई करत स्वप्नीलला अटक केली होती. अटकेनंतर हा आरोपी तब्बल 40 दिवस जेलमध्ये होता आणि त्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली. मात्र, अटकेच्या वेळी आणि त्यानंतरच्या तपासात ही व्यक्ती सरकारी कर्मचारी असल्याचे समोर आले नव्हते.

( नक्की वाचा : Dombivli : भाजपा नेत्यावरील हल्ला प्रकरणात डोंबिवलीच्या माजी नगरसेवकांना मोठा दिलासा, वाचा कोर्टात काय घडलं? )

6 महिन्यांनंतर पोलिसांना जाग

तपासाच्या चक्रात तब्बल 6 महिन्यांचा काळ उलटल्यानंतर 27 डिसेंबर 2025 रोजी मानपाडा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी केडीएमसी प्रशासनाला एक पत्र पाठवले. या पत्राद्वारे त्यांनी कळवले की, तुमचा कर्मचारी स्वप्नील जोशी याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल असून तो 40 दिवस जेलमध्ये होता. 

स्वप्नील जोशी हा केडीएमसीच्या फ प्रभाग कार्यालयात कार्यरत होता. पोलिसांच्या या पत्रानंतर महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. एखादा आरोपी 40 दिवस जेलमध्ये असताना तो काय काम करतो याची माहिती पोलीस तपास अधिकाऱ्याला का नव्हती, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

( नक्की वाचा : NEET-PG Cut-Offs:उणे 12 गुण असूनही मेडिकलला सीट! केंद्र सरकारच्या एका निर्णयामुळे गुणवत्तेचे वाजले बारा )

जेलमध्ये असतानाही मिळाला पगार

या प्रकरणातील सर्वात संतापजनक आणि आश्चर्याची बाब म्हणजे स्वप्नील जोशी जेलमध्ये असतानाही महापालिकेने त्याचा पगार रोखला नाही. नियमानुसार कोणताही शासकीय कर्मचारी 48 तासांपेक्षा जास्त काळ पोलीस कोठडीत किंवा जेलमध्ये असेल तर तो निलंबित होतो. 

मात्र, जोशी 40 दिवस गैरहजर असूनही त्याची हजेरी कोणी लावली आणि त्याला पगार कसा दिला गेला, हा मोठा तांत्रिक आणि प्रशासकीय घोळ समोर आला आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये याआधी मृत आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची नावे आल्याचा प्रकार ताजा असतानाच आता जेलमधील कर्मचाऱ्याला पगार देण्याचा अजब प्रताप उघड झाला आहे.

प्रशासकीय कारवाईकडे लक्ष

सध्या केडीएमसी प्रशासनाकडून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. स्वप्नील जोशी याने आपली माहिती लपवली की त्याला प्रशासनातील कोणाचे पाठबळ होते, याचा शोध घेतला जात आहे. या निष्काळजीपणासाठी जबाबदार असलेल्या महापालिका अधिकाऱ्यांवर आणि तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर शासन काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणामुळे सरकारी कार्यालयातील हजेरी आणि कर्मचाऱ्यांच्या चारित्र्य पडताळणीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com