- कल्याणमध्ये पोलीस कर्मचाऱ्याला चार तरुणांनी बेदम मारहाण केली आहे
- मारहाण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव विलास भागीत असून ते सध्या खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत
- मारहाण करणारे शिवसेना शिंदे गटाशी संबंधित शहाड परिसरातील असल्याचं समजतं.
अमजद खान
"विरुद्ध दिशेने गाडी का घातली" असा जाब विचारल्याने एका वाहतूक पोलिसाला बेदम मारहाण केल्याची घटना कल्याण मध्ये घडली आहे. विलास भागीत असे या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. मारहाण झाल्याने ते जखमी झाले. त्यानंतर त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या मारहाणीचा व्हिडीओ ही व्हायरल झाला आहे. बाजारपेठ पोलिसांनी मारहाण करणाऱ्या चौघांचा शोध सुरू केला आहे.
कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी चौक परिसरात रात्री दहाच्या सुमारास वाहतूक कोंडी झाली होती. त्याच ठिकाणी विलास भागीत हे कर्तव्यावर होते. वाहतूक कोंडी सोडवताना भागीत यांनी पाहीले की एक कार विरुद्ध दिशेने येत आहे. कार नंबर (MH 05 CA 0400) या कारचालकाला त्यांनी कार थांबवायला सांगितली. "तुम्ही विरुद्ध दिशेने का गाडी घालताय" असा जाब पोलीस कर्मचारी विलास भागीत याने कार चालकाला विचारला.
मात्र कार चालक आपली चूक मान्य न करता पोलीस कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घालायला सुरुवात केली. वाद एवढा विकोपाला गेला की कारमध्ये बसलेल्या चार तरुणांनी वाहतूक पोलीस विलास भागीत यांच्यावर हल्ला केला. त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. मारहाण करताना तिथे गोंधळ निर्माण झाला. प्रकरण चिघळणार हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते चौघेही पसार झाले. भागीत यांना कल्याण मधील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. तिथे त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
बाजारपेठ पोलिसांनी मारहाण करणाऱ्या चौघांच्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे. मारहाण करणारे हे शहाड परिसरातील राहणारे आहेत. शिवसेना शिंदे गटाचे हे चौघेही समर्थक असल्याची माहिती समोर येत आहे. यांना शोधण्यासाठी पोलीस त्यांच्या घरी गेली. घराची झडती घेण्यात आली. घरात कोणीही सापडले नाही. यांना शोधण्यासाठी पोलिसांची दोन पथकं रवाना झाली आहेत. मात्र एका पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्याची घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.