अमजद खान
कल्याण- दावडी आणि शारदानगरातील संतप्त नागरीकांनी भाजपचे माजी नगरसेवक जालिंदर पाटील यांच्या पुढाकारने डोंबिवली एमआयडीसी कार्यालयावर बुधवारी धडक मोर्चा काढला. आम्हाला पाणी कधी मिळणार. वारंवार आंदोलने मोर्चे काढून देखील केवळ आमच्या तोंडाला आश्वासनाची पाने पुसली जातात. दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करता येत नसेल तर आश्वासन देऊन नागरीकांची फसवणूक करता का ? नागरीकांची फसवणूक करणे सोडा अन्यथा तुम्हाला खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही असे नागरीकांनी अधिकारी वर्गाला सुनावले. या आंदोलनाने एकच गोंधळ उडाला.
नक्की वाचा - Satara Doctor Case: 'ही हत्याच!, एका 'री' ने केसला कलाटणी? सॉलिड थिअरी आली समोर
मोर्चा जेव्हा एमआयडीसी कार्यालयात पोहचला. तेव्हा संतप्त नागरीकांनी अधिकारी वर्गाच्या दालनात घुसून एमआयडीसी कार्यालयाची दारे बंद करुन अधिकारी वर्गाला कोंडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी नागरीकांची कशीबशी समजूत घातली. त्यानंतर नागरीकांनी रिकाम्या हंडा कळशीचा नाद करीत एमआयडीसीच्या भोंगळ कारभाराचा जाहिर निषेध केला. यावेळी माजी नगरसेवक पाटील यांनी सांगितले की, दावडी परिसरात गेल्या एक वर्षापासून पाणी टंचाई आहे. या प्रकरणी खासदार आणि आमदार यांच्याकडे हा प्रश्न मांडला. त्यांच्याकडून अधिकारी वर्गाला फोन गेले की, तेवढ्यापूरते पाणी मिळते असं ते म्हणाले.
त्यानंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती असते. या प्रकरणी तीन वेळा मोर्चा काढून आंदोलन केले आहे. त्यानंतर आजच्या आंदोलनाची चौथी वेळ आहे. प्रत्येक वेळी लेखी आश्वासन दिले जाते. त्या प्रमाणे आजही लेखी आश्वासन दिले गेले आहे. या आश्वासनाची पूर्तता झाली नाही तर यावेळी नागरिकांना आवरणे कठीण जाईल. त्यांचा संयम सुटेल. त्यानंतर संतप्त नागरीकांनी कायदा हाती घेत उग्र आंदोलन केले तर त्याला एमआयडीसी आणि केडीएमसी जबाबदार असेल असा इशाराही त्यांनी दिला आहे. यापूर्वी दिलेल्या लेखी आश्वासनात सकाळी चार आणि संध्याकाळी तीन तास पाणी पुरवठा केला जाईल असे आश्वासन देण्यात आले होते. त्याची पूर्तता झालेली नाही. केवळ एक तासापूरते पाणी सोडले जाते.