महाराष्ट्रात चाललंय काय? कल्याण शीळ रस्त्यावरील पुलाच्या कामासाठी फक्त 4 मजूर

'कोट्यवधी किमतीच्या पुलाच्या कामाकरिता केवळ चार मजूर लावले आहेत. अशा पद्धतीनं काम होणार कसं? '

Advertisement
Read Time: 2 mins
कल्याण:

अमजद खान, कल्याण

कोट्यवधी किमतीच्या पुलाच्या कामाकरिता केवळ चार मजूर लावले आहेत. अशा पद्धतीनं काम होणार कसं? असा संतप्त सवाल मनसे आमदार राजू पाटील यांनी अधिकाऱ्यांकडे उपस्थित केला आहे. पत्री पूल, दिवा पूल,  पालवा उड्डाणपूल आणि देसाई खाडी पूल ही सर्व कामे कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे रखडली आहेत. आमदारांचा संताप पाहून एम.एस.आर.टी.सीचे सहाय्यक संचालक मनोज जिंदाल यांनी कंत्राटदाराला दंड ठोठावण्याची सूचना करीत कारवाई करण्यात येईल असं सांगितलं आहे. 

कल्याण शीळ रस्त्यावर एकीकडे मेट्रोचे काम सुरू आहे, तर दुसरीकडे पलावा जंक्शन पुलाचे काम सुरू आहे. या दोन्ही पुलांची कामे दोन वर्षांपासून सुरू आहेत. ही कामे झाली तर वाहतूक कोंडीतून वाहनचालकांसह नागरिकांची सुटका होणार आहे. मात्र दोन्ही पुलांची कामं संथ गतीने सुरू आहे. त्याचा फटका चाकरमान्यांना, वाहन चालकांना आणि स्थानिक नागरिकांना बसत आहे. या संदर्भात मनसे आमदार राजू पाटील यांनी वारंवार पाठपुरावा केला आहे.

Advertisement

मात्र प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप त्यांनी या आधीच केला होता. आज आमदार पाटील यांनी एमएसआरडीसीचे सहाय्यक संचालक मनोज जिंदाल यांच्यासह कल्याण शीळ रस्त्यावर असलेल्या देसाई खाडीवरील पूल तसेच पुढे पलावा जंक्शन परिसरातील सुरू असलेल्या पुलाच्या कामाची  पाहणी केली. धक्कादायक म्हणजे देसाई पुलाच्या कामासाठी एका बाजूला फक्त चार आणि दुसऱ्या बाजूला चार कामगार काम करीत होते, असा आरोप लावण्यात आला.

Advertisement

नक्की वाचा - मित्राची हत्या करुन मृतदेह बॅगेत भरला आणि दादर स्थानकात पोहोचले; तुतारी एक्स्प्रेस पकडणार तोच...

यानंतर मनसे आमदार राजू पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला. पत्री पूल, दिवा पूल यांच्यासह दोन्ही पुलांच्या कामात हलगर्जीपणा केला जात आहे. त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. जिंदाल यांनी देखील कामाविषयी नाराजी व्यक्त केली आहे. कंत्राटदाराच्या व्यक्तीला त्यांनी खडे बोल सुनावले आहेत. कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा चालणार नाही. कामात जो विलंब होत आहे, त्यासाठी तुम्हाला आम्ही दंड ठोठावणार आहोत. हे काम लवकरात लवकर मार्गी लागले पाहिजे नाहीतर मी कारवाई करणार असा सज्जड दम ही भरला आहे .यावेळी आमदार राजू पाटील यांनी पलावा उड्डाणपूल कामा आड येणाऱ्या बेकायदेशीर बांधकामासंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केली. हे बेकायदा बांधकाम लवकरच काढण्यात येईल असं आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलं आहे. आता तरी कल्याण शीळ रस्त्यावरील उड्डाण पुलाच्या कामांना वेग येणार का? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

Advertisement