मुंबईतील वर्दळीच्या दादर रेल्वे स्थानकावर एका बॅगमध्ये मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. हत्येनंतर मृतदेह सुटकेसमध्ये भरुन दोघे मित्र निघाले होते. रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) आणि रेल्वे पोलीस (GRP) सामान तपासणी करत असताना त्यांना सूटकेसमध्ये मृतदेह आढळून आला.
पोलिसांनी चौकशी केली असता हा खून पायधुनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाल्याचे उघड झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती आणि आरोपींमध्ये त्यांच्या मैत्रिणीवरुन वाद झाला होता. या वादानंतर आरोपी जय चावडा आणि त्याचा साथीदार शिवजीत सिंग यांनी मिळून अर्शद अली शेख याची हत्या केली.
हत्येनंतर, रविवारी रात्री आरोपींनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तुतारी एक्स्प्रेस ट्रेनने प्रवास करण्याचा प्लान केला. आरोपी सुटकेस घेऊन दादर स्थानकात आहे. मात्र दोघांच्या हालचाली पाहून पोलिसांना संशय आला. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशी आरोपींचं बिंग फुटलं. मृतदेह पूर्णपणे प्लास्टिकमध्ये गुंडाळलेला होता आणि सुटकेसमध्ये पॅक केला होता अशी माहिती पोलिसांनी दिली.
दादर रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करून एका संशयिताला रेल्वे स्थानकावर अटक केली. दुसरा आरोपी पळून गेला होता, त्याला उल्हासनगरमध्ये अटक करण्यात आली. दोन्ही आरोपी मुकबधीर आहेत त्यामुळे सांकेतिक भाषेचा वापर करून त्यांच्याशी संवाद साधून चौकशी केली जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार, आरोपींचे त्याच्या मित्रासोबत मैत्रिणीवरून भांडण झाले होते. पीडितेला मृत व्यक्तीच्या घरी पार्टीसाठी बोलावण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला आणि वाद टोकाला जाऊन हत्येपर्यंत पोहोचला. पोलीस अधिक तपास करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world