मुंबईसह उपनगरातील प्रवाशांसाठी एक आनंदाची आणि तितकीच काळजीची बातमी आहे. ठाणे आणि कल्याणला जोडणाऱ्या मेट्रो-5 मार्गाचे काम आता अधिक वेगाने सुरू होणार आहे. ही मेट्रो धावणार असली तरी, या मार्गातील 292 बांधकामे पाडण्याची वेळ आली आहे. यात अनेकांचे हक्काचे घर आणि दुकान समाविष्ट आहेत. ज्यामुळे स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. हा बांधकामे पाडल्यानंतर या प्रकल्पाला आणखी गती येणार आहे. एकीकडे मुंबईतले मेट्रोचे प्रकल्प मार्गी लागत आहेत. तर दुसरीकडे एमएमआरमधील प्रकल्पांनाही आता गती आली आहे.
या मेट्रोच्या कामामुळे कुणाचे घर जाणार आहे तर कुणाचे दुकान जाणार आहे. प्रगतीच्या या मार्गात 108 घरे आणि 184 दुकाने पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आपला व्यवसाय आणि घरासाठी जागा गमावणाऱ्या या कुटुंबांना आणि व्यापाऱ्यांना योग्य भरपाई मिळणार का, हा मोठा प्रश्न आहे. याशिवाय, मेट्रोच्या उभारणीमुळे धूळ, आवाज आणि पाण्याचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होण्याची भीती आहे. अशा स्थितीत स्थानिकांमध्ये ही चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.
ठाण्यातील कापूरबावडी जंक्शन ते कल्याणमधील कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंत हा मेट्रो मार्ग असेल. ठाणे ते भिवंडी येथील धामणकर नाक्यापर्यंतच्या पहिल्या 11.895 किमी टप्प्याचे 60% काम पूर्ण झाले आहे. MMRDA हा प्रकल्प करत असून, एशिया इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेची यासाठी आर्थिक मदत मिळत आहे. या मेट्रो मार्ग पुर्ण झाल्यानंतर ठाणे ते कल्याण दरम्यानचा प्रवास अधीक वेगवान आणि सुखकर होणार आहे. अनेक वर्षापासून ठाणे कल्याण मेट्रोची मागणी होत होती.
नक्की वाचा - Viral video: ही अमेरिकन महिला म्हणते भारतात अजिबात जाऊ नका, कारण ऐकून धक्का बसेल
या बांधकामांचे आणि प्रदूषणाचे थेट परिणाम सामान्य नागरिकांवर होणार आहेत असं सांगितलं जात आहे. त्यामुळे, या प्रकल्पाचा सामाजिक आणि पर्यावरणीय अभ्यास (MMRDA) करण्यात येत आहे. कल्याणमधील काल्हेर येथील डेपोसाठी 27.25 हेक्टर खासगी जमीनही घेतली जाणार आहे. विकास महत्त्वाचा, पण लोकांचे जीवनमान आणि पर्यावरण जपणे हेही तितकेच गरजेचे आहे असा सुर काही जण काढत आहे. हा प्रकल्प लवकरच मार्गी लागेल असं सांगितलं जात आहे. त्यामुळे आता हा मेट्रो मार्ग सुरू होण्याची प्रतिक्षा आहे.