Kalyan News: "पाण्याच्या टाकीत विष टाका, आम्ही मरून जाऊ!" कल्याणमधील नागरिकांचा संयम सुटला

Kalyan News: कल्याण पूर्वेतील भीषण पाणीटंचाईमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आणि माजी नगरसेवकांनी केडीएमसीच्या (KDMC) 'ड' प्रभाग कार्यालयावर धडक दिली.

जाहिरात
Read Time: 2 mins

Kalyan News: कल्याण पूर्वेतील नागरिकांना थेंबभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. "लहान मुले आंघोळ न करता शाळेत जात आहेत, सणांनाही पाणी मिळाले नाही," असा टाहो फोडत कल्याण पूर्वेतील शेकडो महिलांनी सोमवारी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या मांडला.

नागरिकांची 'ड' प्रभाग कार्यालयावर धडक

कल्याण पूर्वेतील खेडेगोळवली, कैलासनगर आणि आशेळे पाडा या परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. या प्रश्नावर भाजपचे माजी नगरसेवक मनोज राय, शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक मधुर म्हात्रे आणि नगरसेविका पूजा गायकवाड यांच्या नेतृत्वात सोमवारी पालिका प्रशासनावर मोर्चा काढण्यात आला.

Advertisement

(नक्की वाचा-  Solapur News: करमाळ्यातून अचानक गायब होत आहेत मुली-महिला; तालुक्यात भीतीचं वातावरण!)

उपअभियंत्यांना 2 तास कोंडले

आंदोलकांनी पाणी पुरवठा खात्याचे उपअभियंता राजेश गोयल यांच्या दालनात घुसून त्यांना घेराव घातला. सुमारे दोन तास महिलांनी तिथेच ठिय्या दिला आणि प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. संतप्त महिलांनी अधिकाऱ्याला जाब विचारताना म्हटले की, "पाणी मिळत नसेल तर आम्हाला मारून टाका, पालिकेच्या टाकीत विष टाका म्हणजे आमचा प्रश्न कायमचा सुटेल!"

पाणीटंचाई का होत आहे?

घेराव घातल्यानंतर अभियंता राजेश गोयल यांनी पाणीटंचाईची काही तांत्रिक बाबी नागरिकांना सांगण्याचा प्रयत्न केला. यात बारावे जलशुद्धीकरण केंद्रातून पुरेसा पाणीपुरवठा होत नाहीये. वारंवार वीज खंडित होत असल्याने पंम्पिंगवर परिणाम होत आहे. उन्हाळ्यामुळे उल्हास नदीच्या पाण्याची पातळी खालावली असून पाण्यात कचरा येत असल्याने शुद्धीकरणाला वेळ लागत आहे, या गोष्टी सांगितल्या.

(नक्की वाचा-  VIDEO: पनवेलच्या कामोठ्यात नागरिकांच्या जीवाशी खेळ! मेडिकलमध्ये घुसून 'मनसे'ने उतरवला तरुणाचा माज)

नागरिकांचा तीव्र आंदोलनाचा इशारा

"प्रशासनाचे आश्वासन आम्हाला नको, आम्हाला पाणी हवे," अशी भूमिका माजी नगरसेवक मनोज राय आणि मधुर म्हात्रे यांनी घेतली. जर येत्या काही दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही, तर संपूर्ण कल्याण पूर्व रस्त्यावर उतरेल आणि यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा पालिकेला देण्यात आला आहे.

Topics mentioned in this article