Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आयुर्वेदिक वनस्पतींच्या शोधात डोंगरदऱ्यांत गेलेल्या एका महाराजांचा 200 फूट खोल दरीत कोसळून मृत्यू झाला. राजू बाबूराव राजगुरे उर्फ कमलगिरी महाराज असे त्यांचे नाव आहे. तर गुरुवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर त्यांना बाहेर काढण्यासाठी गावकऱ्यांनी 7 तास शर्थीचे प्रयत्न केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.
कमलगिरी महाराज गुरुवारी सकाळी सिल्लोडमधील केळगाव येथील श्री क्षेत्र मुर्डेश्वरपासून 3 किमी अंतरावर असलेल्या मुर्डेश्वर डोंगरावर वनौषधी शोधण्यासाठी गेले होते. यावेळी पाय घसरल्याने ते थेट दोनशे फूट खोल दरीत कोसळले. या अपघातात त्यांच्या हाता-पायांसह पूर्ण शरीराला गंभीर दुखापत झाली.
(नक्की वाचा- धाराशिवकर गूढ आवाजाने हादरले! 2 दिवसांपासून नागरिकांमध्ये घबराट, प्रशासनाचे अलर्ट राहण्याचे आवाहन)
पत्नी-मुलांशी फोनद्वारे संवाद साधला
दरीत अडकलेले असतानाही महाराज शुद्धीत होते, त्यांनी मोबाईलद्वारे आपल्या पत्नीशी आणि मुलगा वैभवशी संपर्क साधला होता. इतकेच नव्हे तर दरीत अडकलेले असताना त्यांनी सुमारे 2 लिटर पाणीही प्यायले होते.
(नक्की वाचा- Ajit Pawar on ZP Election: "शब्द पाळणे ही माझी ओळख...", मतदानापूर्वी अजित पवारांची मतदारांना अखेरची साद)
महाराजांना बाहेर काढण्यासाठी गावकऱ्यांनी डोंगरात सुमारे 200 फुटांचा तात्पुरता मार्ग तयार केला. सकाळी 9 वाजता दरीत कोसळलेल्या महाराजांना दुपारी 4 वाजता बाहेर काढण्यात यश आले. मात्र, त्यांना रुग्णवाहिकेतून सिल्लोड रुग्णालयात नेत असतानाच वाटेत त्यांचा मृत्यू झाला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world