अमजद खान, प्रतिनिधी
KDMC Viral News : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी संस्काराच्या शिदोरीतील उत्तम गुणदर्शन घडवलं आहे. सफाई कर्मचाऱ्यांनी कचऱ्याच्या घंटा गाडीत सापडलेले सोन्याचे दागिने महिलेला परत केले. अंकिता मोरे असं या महिलेचं नाव असून तिने केडीएमसीच्या सर्वच कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार,कल्याण पूर्वेच्या ड प्रभाग क्षेत्र कार्यालयाजवळ पूना लिंक रोडवर जय शिव सह्याद्री सोसायटी नावाची चाळ आहे. या चाळीतून नेहमीप्रमाणे सुमित कंपनीच्या सफाई कर्मचाऱ्यांनी सकाळच्या वेळेत कचरा संकलन केले. त्याचदरम्यान, चाळीत राहणाऱ्या अंकिता अनिल मोरे या महिलेचे सोन्याचे ईअर रिंग्ज कचरा गाडीत पडले.
परंतु, सोन्याचे दागिने घंटागाडीत पडल्याचं त्यांच्या लक्षात आलं नाही.त्यानंतर अंकिता मोरे यांनी तातडीनं सुमित कंपनीचे सुपर व्हायजर भूषण सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला आणि घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर सूर्यवंशी यांनी कचरा गाडीचे लोकेशन शोधून काढले. ही गाडी त्याच परिसरातील नूतन ज्ञानमंदिर शाळेजवळ कचरा संकलनाचे काम करत होती.भूषण सूर्यवंशी यांनी तात्काळ अंकिता मोरे यांना त्याठिकाणी नेलं.
केडीएमसीच्या सफाई कामगारांचं सर्वत्र होतंय कौतुक
त्यावेळी घंटागाडीत असलेल्या विनोद बेलीलकर, चैतन्य वाजे,सुनील तेलम या कर्मचाऱ्यांनी गाडीतील सर्व कचरा बाहेर काढला. तेव्हा कचऱ्यात पिशवी आणि कागदाची पुडी असल्याचं त्यांना दिसलं.त्यात सोन्याचे दागिने होते. हे पाहून अंकिता मोरे यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. जवळपास पाऊण तासाच्या शोधमोहिमेनंतर अंकिता मोरे यांचे दागिने सापडले. यावेळी केडीएमसीचे स्वच्छता निरीक्षक अमित भालेराव आणि सुमित कंपनीचे युनिट ऑफिसर समीर खाडे हेदेखील उपस्थित होते.
नक्की वाचा >> मैत्री आधी, क्रिकेट नंतर..स्मृती मंधानाच्या दु:खद काळात जेमिमा रॉड्रिग्जने घेतला सर्वात मोठा निर्णय
"हे केवळ सोन्याचे दागिने नव्हे, तर..."
"सातवीत असताना आई बाबांनी खास माझ्यासाठी हे सोन्याचे कानातले घेतले होते.आज माझ्या लग्नाला 27 वर्ष झाली असून हे केवळ कानातले नाही तर माझ्या आई वडिलांची आठवणच आहे.ते परत मिळवून दिल्याबद्दल केडीएमसी सफाई कर्मचारी आणि सुमित एल्कोप्लास्ट कंपनीचे मनापासून आभारी आहोत",दरम्यान, अंकिता मोरे यांचा वाढदिवस असल्याने हा दिवस त्यांच्यासाठी अतिशय खासच ठरला, अशी प्रतिक्रिया त्यांच्या शेजाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली.
नक्की वाचा >> आईचा मृतदेह घरात ठेवला! मुलानं 3 वर्ष घेतला पेन्शनचा लाभ, केलं असं काही..सरकारी कर्मचारीही झाले थक्क
विशेष म्हणजे गेल्या महिन्यातही कल्याण पूर्वेतील एका महिलेचा सोन्याचा हार चुकून कचऱ्यात गेला होता. ते दागिनेही केडीएसमी आणि सुमित कंपनीच्या सफाई कर्मचाऱ्यांनी संबंधित महिलेला परत मिळवून दिलं होतं. आजही त्याच घटनेची पुनरावृत्ती झाली असून केडीएमसी सुमित कंपनीच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाबाबत सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.