KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत 'गेम' सुरु, भाजपा नेत्याचा महापौरपदाबाबत खळबळजनक दावा, शिवसेना काय करणार?

KDMC Election Result 2026 : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आता सत्तेचे समीकरण जुळवण्यासाठी मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

जाहिरात
Read Time: 3 mins
KDMC Election Result 2026 : कल्याण डोंबिवलीचा महापौर कोण होणार? हा पेच कायम आहे.
कल्याण:

Who will be next Mayor of Kalyan Dombivli : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर आता सत्तेचे समीकरण जुळवण्यासाठी मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. महायुतीने बहुमताचा आकडा पार केला असला तरी, महापौर कोणाचा होणार यावरून आता भाजप आणि शिवसेना या महायुतीमधील मित्रपक्षांमध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे. विशेष म्हणजे भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी महापौर पदाच्या पहिल्या अडीच वर्षांच्या टर्मवर भाजपने दावा केला पाहिजे, अशी मागणी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

भाजपाचाच महापौर हवा

कल्याण डोंबिवलीत महायुतीच्या एकूण 102 जागा निवडून आल्या आहेत. यामध्ये भाजपचे 50 आणि शिवसेना शिंदे गटाचे 52 नगरसेवक विजयी झाले आहेत. दोन्ही पक्षांच्या आकड्यांमध्ये फारसे अंतर नसल्याने आता महापौर पदासाठी चुरस निर्माण झाली आहे. 

भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी आक्रमक भूमिका घेत म्हटले आहे की, केडीएमसीत पहिली टर्म भाजपला मिळाली पाहिजे. त्यांच्या या विधानामुळे महायुतीत महापौर पदावरून पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षांकडून आपलाच महापौर बसवण्यासाठी आता पडद्यामागे जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.

( नक्की वाचा : KDMC Election 2026 : कल्याण डोंबिवलीत 'पॉवर गेम' महापौरपदी कुणाची होणार निवड? वाचा कोण आहेत प्रबळ दावेदार )

मनसे आणि ठाकरे गटाचे नगरसेवक भाजपच्या संपर्कात

नरेंद्र पवार यांनी केवळ महापौर पदावर दावा केला नाही, तर एक मोठा गौप्यस्फोटही केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे गटाचे अनेक नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या दाव्यामुळे विरोधी पक्षांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. महायुतीकडे स्पष्ट बहुमत असतानाही इतर पक्षांतील नगरसेवकांना आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न सुरू असल्याने कल्याण डोंबिवलीच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Advertisement

नगरसेवकांना अज्ञात स्थळी हलवले

दुसरीकडे, आपल्या पक्षाचे नगरसेवक फुटू नयेत यासाठी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेने कंबर कसली आहे. ठाकरे गटाने आपल्या 11 पैकी 9 नगरसेवकांना खबरदारीचा उपाय म्हणून अज्ञात स्थळी हलवले आहे.

( नक्की वाचा : TMC Election 2026 : ठाण्यात शिवसेनेचेच वर्चस्व; महापौरपदासाठी 'ही' नावं आघाडीवर, पाहा कुणाला देणार शिंदे बढती! )

 मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनीही त्यांच्या 5 नगरसेवकांना सुरक्षित ठिकाणी ठेवले आहे. भाजप आणि शिंदे गट या दोघांचीही नजर विरोधी पक्षाच्या निवडून आलेल्या 19 नगरसेवकांवर आहे. यामध्ये काँग्रेसचे 2 आणि शरद पवार गटाच्या 1 नगरसेवकाचा समावेश आहे. यातील बहुसंख्य नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असल्याचीही चर्चा आहे.

जुना संघर्ष आणि नव्या युतीचा पेच

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपची युती 1995 पासून आहे, मात्र या दोन्ही पक्षांमधील संबंध नेहमीच तणावाचे राहिले आहेत. 2020 मध्ये भाजपने शिवसेनेची साथ सोडून विरोधी बाकावर बसण्याचा निर्णय घेतला होता. 

Advertisement

यंदाच्या निवडणुकीत दोन्ही पक्षांची स्वबळावर लढण्याची तयारी असताना ऐनवेळी युती झाली. आता सत्ता स्थापनेची वेळ आल्यावर पुन्हा एकदा जुन्या संघर्षाची ठिणगी पडताना दिसत आहे. पहिल्या अडीच वर्षांसाठी कोणाला संधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.