जाहिरात

TMC Election 2026 : ठाण्यात शिवसेनेचेच वर्चस्व; महापौरपदासाठी 'ही' नावं आघाडीवर, पाहा कुणाला देणार शिंदे बढती!

Thane Municipal Election 2026 : ठाणे महापालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर आता सर्वांचं लक्ष महापौरपदी कुणाची वर्णी लागते याकडे लागलं आहे.

TMC Election 2026 : ठाण्यात शिवसेनेचेच वर्चस्व; महापौरपदासाठी 'ही' नावं आघाडीवर, पाहा कुणाला देणार शिंदे बढती!
Thane Municipal Election 2026 : ठाण्याचा महापौर कोण होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
ठाणे:

रिझवान शेख, प्रतिनिधी

Thane Municipal Election 2026 : ठाणे महापालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर आता सर्वांचं लक्ष महापौरपदी कुणाची वर्णी लागते याकडे लागलं आहे. 131 जागांच्या सभागृहात तब्बल 75 जागा जिंकून शिवसेनेने एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले आहे. विजयाचा गुलाल उधळल्यानंतर आता खऱ्या अर्थाने ठाण्याच्या प्रथम नागरिकपदासाठी रस्सीखेच सुरू झाली असून यामध्ये अनेक ज्येष्ठ आणि अनुभवी नगरसेवकांची नावे चर्चेत आली आहेत.

शिंदेंच्या शिवसेनेचे ठाण्यावर निर्विवाद वर्चस्व

ठाणे महापालिका निवडणुकीच्या निकालात शिवसेनेने 71 जागांवर स्पष्ट विजय मिळवला असून 4 जागांवर आघाडी कायम असल्याने हा आकडा 75 पर्यंत पोहोचला आहे. भाजपने 28 जागांवर विजय मिळवून आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) 9 जागांवर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) 12 जागांवर विजयी झाली आहे. 

एमआयएमने 5 जागा जिंकून सर्वांना चकित केले असले तरी, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मात्र केवळ 1 जागेवर समाधान मानावे लागले आहे. काँग्रेस आणि मनसेला या निवडणुकीत खातेही उघडता आलेले नाही.

( नक्की वाचा : BMC Election Result 2026: मुंबईच्या महापौरासाठी भाजप आता 'एकनाथ शिंदें'नाच धक्का देणार? ठाकरेंचे खळबळजनक भाकीत )

भोईर कुटुंबाचा दावा प्रबळ

महापौर पदाच्या शर्यतीत प्रभाग क्रमांक 08 मध्ये गेल्या 5 दशकांपासून वर्चस्व गाजवणारे भोईर कुटुंब आघाडीवर असल्याचे मानले जात आहे. यामध्ये देवराम भोईर, संजय भोईर आणि उषा भोईर या नावांचा प्रामुख्याने समावेश आहे. ग्रामपंचायत काळापासून राजकारणात सक्रिय असलेल्या या कुटुंबाचा दांडगा अनुभव पक्षासाठी मोलाचा ठरला आहे.

 देवराम भोईर यांनी यापूर्वी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले असून त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा विचार करून पक्षाकडून त्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

( नक्की वाचा : Chhatrapati Sambhajinagar : संभाजीनगरमधील तुमच्या प्रभागात कोण जिंकले? विजयी उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर )

मुख्यमंत्री शिंदेंचे विश्वासू राम रेपाळे

किसन नगर येथील प्रभाग क्रमांक 17 मधून सलग 3 दशकांपासून निवडून येणारे राम रेपाळे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. पक्षाचे सचिव म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या रेपाळे यांच्यावर शिंदेंनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीची महत्त्वाची जबाबदारी सोपवली होती. 

संकटकाळात आणि राजकीय स्थित्यंतराच्या वेळी त्यांनी शिंदेंना दिलेली खंबीर साथ लक्षात घेता, महापौर पदाच्या शर्यतीत त्यांचे नाव सध्या सर्वात आघाडीवर घेतले जात आहे.

आक्रमक नेत्या मीनाक्षी शिंदे यांची चर्चा

माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. ठाणे शिवसेना महिला जिल्हा संघटक म्हणून त्या कार्यरत असून 2022 मध्ये जेव्हा एकनाथ शिंदे यांनी उठाव केला, तेव्हा असंख्य महिला कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्या शिंदेंच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या होत्या. आक्रमक नेत्या आणि अनेक बड्या नेत्यांना अंगावर घेण्याची क्षमता असणारी नेत्या अशी त्यांची ओळख आहे. कार्यकर्त्यांसाठी पदाचा त्याग करण्याची त्यांची वृत्ती पाहता, त्यांच्या नावाचा विचार पुन्हा एकदा होऊ शकतो.

अनुभवी हनुमंत जगदाळे 

प्रभाग क्रमांक 06 मधून गेल्या 5 दशकांपासून सातत्याने निवडून येणारे हनुमंत जगदाळे हे ठाणे राजकारणातील एक मोठे नाव आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला ठाण्यात वाढवण्यासाठी त्यांनी मोठी मेहनत घेतली होती, परंतु आता ते शिवसेना शिंदे गटात सक्रिय आहेत. त्यांच्याकडे असलेला प्रशासकीय कामाचा आणि राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव विचारात घेता, ज्येष्ठ नगरसेवक म्हणून त्यांच्या नावाचा विचार महापौर पदासाठी केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जयश्री फाटक आणि सुखदा मोरे यांची नावेही चर्चेत

माजी आमदार आणि शिवसेनेचे उपनेते रवींद्र फाटक यांच्या पत्नी जयश्री फाटक यांचे नावही या शर्यतीत आहे. त्या प्रभाग क्रमांक 17 मधून गेल्या 4 दशकांपासून निवडून येत असून त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. 

त्यांच्यासोबतच शिवसेनेचे सचिव आणि माजी महापौर संजय मोरे यांच्या पत्नी सुखदा मोरे यांच्या नावाचीही चर्चा रंगली आहे. संजय मोरे यांनी ही सुखदा मोरे यांची शेवटची निवडणूक असल्याचे सूतोवाच केल्यामुळे, त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा सन्मान म्हणून त्यांना संधी दिली जाईल का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.


 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com