KDMC Election 2026 : कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडल्या. या निवडणुकीत सत्तारुढ भाजपा -शिवसेना युती विरुद्ध शिवसेना (उबाठा) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) युती यांच्यात थेट लढत होत आहे. या निवडणूक प्रचारात मनसेचे नेते राजू पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार का, या चर्चेने पुन्हा एकदा वेग घेतला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी एक सूचक विधान केले होते.त्यांनंतर ही चर्चा सुरु झाली होती.
काय म्हणाले होते चव्हाण?
दोन दिवसांपूर्वी मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला होता. या कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी एक सूचक विधान केले होते. सर्व मित्र आपल्यासोबत येत आहेत आणि लवकरच एक मोठा मित्र देखील भाजपमध्ये येईल, असे चव्हाण यांनी म्हटले होते.
चव्हाण यांनी थेट नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख कल्याण ग्रामीणचे माजी आमदार राजू पाटील यांच्याकडेच असल्याचे बोलले जात होते. रवींद्र चव्हाण यांच्या या विधानामुळे कल्याण डोंबिवलीच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून राजू पाटील नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
( नक्की वाचा : Ravindra Chavan : रविंद्र चव्हाणांनी सोडली जीन्स आणि नेसली लुंगी! सोशल मीडियावर चर्चा, पण खरं कारण झालं उघड )
राजू पाटील यांचे उत्तर
रविंद्र चव्हाण यांनी केलेल्या त्या सूचक विधानावर आता राजू पाटील यांनी अत्यंत कडक शब्दांत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राजू पाटील म्हणाले की, रविंद्र चव्हाण हे 1995 पासून माझे मित्र आहेत. त्यांच्या मैत्रीच्या काळात त्यांचे अनेक मित्र मोठे झाले, तर काहींचा एन्काऊंटर देखील झाला आहे. त्यामुळे ते नक्की कोणत्या मित्राबद्दल बोलत होते, हे मला माहित नाही.
या विधानाचा संदर्भ माझ्याशी जोडला जात असेल, तर मी एकच सांगेन की जोपर्यंत ते माझे नाव घेऊन स्पष्टपणे बोलत नाहीत, तोपर्यंत मी त्यांना उत्तर देणार नाही. राजू पाटील यांच्या या उत्तरामुळे सध्या सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळण्याऐवजी नवा ट्विस्ट मिळाला आहे.
( नक्की वाचा : ZP Election 2026: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा, वाचा A to Z माहिती एका क्लिकवर )
भाजपावर जोरदार टीका
भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चेवर बोलताना राजू पाटील यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवरही सडकून टीका केली. लोकांना कन्फ्युज करा आणि कंट्रोल करा ही भाजपची जुनी पद्धत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. माझी पक्षनिष्ठा कोणतीही मैत्री, पैसा किंवा कोणाची दमबाजी विकत घेऊ शकत नाही, असे सांगत त्यांनी आपण राज ठाकरे यांच्या मनसेशी किती एकनिष्ठ आहोत हे पुन्हा एकदा स्पष्ट केले. यामुळे राजू पाटील भाजपमध्ये जाणार या केवळ वावड्या असून ते मनसेमध्येच ठाम राहणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
डोंबिवलीतील राड्यावर व्यक्त केली चिंता
डोंबिवलीत शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यावरही राजू पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. निवडणुकीच्या काळात डोंबिवलीत सर्रासपणे पैसे वाटप सुरू होते आणि अशाच काही संशयास्पद हालचालींमुळे वाद होऊन मारामारी झाली. पैसे वाटप करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई झाली नाही, हे दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले.
ही डोंबिवलीची संस्कृती आहे का, असा सवाल करत अशा प्रवृत्तींविरुद्ध लोकांनी रस्त्यावर उतरून उत्तर दिले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. एकूणच रविंद्र चव्हाण यांच्या विधानाने पेटलेले डोंबिवलीचे राजकारण राजू पाटील यांच्या उत्तरामुळे अधिकच तापले आहे.