अमजद खान
महापालिका निवडणुकांची तयारी सध्या सगळीकडे सुरू आहे. त्यानुसार प्रभाग रचना केल्या जात आहेत. त्यासाठी हरकती ही मागवल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिकेत समावेश केलेल्या 27 गावांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या गावांनी मोठ्या प्रमाणात हरकती दाखल करत आम्हाला महापालिकेतून वगळा अशी मागणी केली आहे. तसे न केल्यास त्याचे परिणाम KDMC च्या अधिकाऱ्यांना भोगावे लागतील अशी भूमीकाच घेण्यात आली आहे. त्यामुळे मोठा प्रश्न कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासना समोर उभा राहीला आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्रभाग रचनेसाठी हरकती मागवण्यात आल्या होत्या. त्यावर आज सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी खासदार सुरेश म्हात्रे, ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे हे उपस्थित होती. त्यावेळी त्यांनी 27 गावांचा प्रश्न लावून धरला. केडीएमसी आयुक्तांनी या गावांना प्रभाग रचनेतून वगळावे अशी मागणी केली. यावेळी कल्याण डोंबिवली महापालिका प्रभाग रचना संदर्भात 265 हरकती आल्याची माहिती केडीएमसी प्रशासनाने दिली होती. मात्र फक्त 27 गावातून 3 हजार 642 हरकती घेण्यात आल्या होत्या. हे आता स्पष्ट झाले आहे.
नक्की वाचा - Kalyan News: रामदेव हॉटेलमध्ये पुन्हा निष्काळजीपणाचा कळस, फ्राईड राईसमध्ये आता आढळले...
या हरकतींची दखल घेतली नव्हती असा आरोप खासदार सुरेश म्हात्रे आणि दीपेश म्हात्रे यांनी केला आहे. कल्याण ग्रामीण मधील 27 गावांच्या सर्व पक्षीय संरक्षण हक्क संघर्ष समितीच्या नेतत्वात खासदार या सुनावणीस हजर राहीले होते. त्यांनी आयुक्तांसोबत या विषयावर चर्चा केली. समितीची एकच मागणी आहे की 27 गावे वगळून प्रभाग रचना तयार करण्यात यावी. 27 गावात निवडणूक घेण्यात येऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे 27 गावांचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे ही बाबही यावेळी आयुक्तांना सांगण्यात आली.
नक्की वाचा - महायुतीत वाद पेटणार! कलानी गटाची शिवसेना शिंदे गटाबरोबर युती, भाजपवर गंभीर आरोप
त्यावर आयुक्तांनी ही या समितीस आश्वासन दिले आहे की, या संदर्भात निवडणूक आयोगाला माहिती देणार आहोत. त्यानंतर पुढचा निर्णय होईल. दरम्यान या गावांना कल्याण डोंबिवली महापालिकेत समाविष्ट व्हायचं नाहीत. उलट त्यांना वेगळी नगरपालिका द्यावी अशी मागणी खासदार सुरेश म्हात्रे यांनी केली आहे. तर ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी ही या 27 गावांचा मुद्दा उचलून धरला आहे. या गावांना वगळूनच प्रभाग रचना केली जावी अशी मागणी त्यांनी या बैठकी वेळी केली आहे. त्यामुळे आता ही 27 गावं वगळली जाणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.