
अमजद खान
Ulhasnagar News: भाजप आणि शिवसेनेत ठाणे जिल्ह्यात वर्चस्वावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्यात आता उल्हासनगर महापालिका निवडणूकसाठी शिवसेना शिंदे गट आणि टीम ओमी कलानी यांच्यात युतीची घोषणा झाली आहे. मात्र आमची युती शिवसेना शिंदे गटा सोबत आहे, भाजपासोबत नाही असे टीम ओमी कलानी यांनी स्पष्ट करत भाजपला धक्का दिला आहे. एवढेच नाही तर भाजपाच्या एका नेत्याच्या विधानावर प्रतिक्रिया देताना भाजपात किती गुन्हेगार आहेत हे बोलण्याचे धाडस टीम ओमी प्रवक्ते कमलेश निकम यांनी दाखवले आहे. एकीकडे शिवसेना शिंदे गट आणि टीम ओमी कलानीमध्ये युती झाली आहे. तर दुसरीकडे भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उल्हासनगर महापालिकेत भाजपाच महापौर बसणार असल्याचा दावा केला आहे. यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्येच तिढा वाढण्याची दाट शक्यता आहे.
उल्हासनगर महापालिका निवडणुकीची प्रभाग रचना जाहीर झाली आहे. दोन दिवसांपूर्वी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत टीम ओमी कलानी समर्थक दोन नगरसेवकांचा भाजपात प्रवेश झाला. या प्रवेशानंतर टीम ओमी कलानीमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. माजी आमदार पप्पू कलानी यांचे सुपुत्र ओमी कलानी यांनी शिवसेना शिंदे गटा सोबत युती करण्याच्या निर्णय घेतला. रविवारी उल्हासनगरमध्ये शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि ओमी कलानी यांच्यात बैठक पार पडली. या बैठकी दरम्यान खासदार श्रीकांत शिंदे यांनी ओमी कलानी आणि त्यांच्या समर्थकांना पेढे भरून स्वागत केले. शिवसेना शिंदे गट आणि टीम ओमी कलानी यांच्यात युती झाल्याचे ही जाहीर केले.
नक्की वाचा - Mamata banerjee: ठाकरेंच्या पावलावर ममता बॅनर्जींचे पाऊल! बंगालमध्ये घेतला मोठा निर्णय
याबाबत शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी सांगितले की, टीम ओमी कलानी आणि शिवसेना शिंदे गटात युती झाली आहे. कोणाचाही पक्ष संपवायचा आणि आपला पक्ष वाढवायचा असा विचार खासदार श्रीकांत शिंदे यांचा नाही, असे ते म्हणाले. भाजपासोबत आमची नैसर्गिक युती आहे. या संदर्भात निवडणुकी दरम्यान बोलणे होईल. महापौर संदर्भात निवडणूक झाल्यानंतर विचार होईल असं ही त्यांनी स्पष्ट केलं. याबाबत टीम ओम कलानी यांचे प्रवक्ते कमलेश निकम यांनी सांगितले की लोकसभेत शिवसेना शिंदे गटासोबत आमची युती होती. आम्हाला यश मिळाले. त्याप्रमाणेच पुढे ही दोस्ती कायम ठेवली आहे असं ते म्हणाले. महापालिका निवडणुकीत देखील आमच्या युतीला यश मिळेल. विकासासाठी आम्ही सर्व एकत्र आलो आहोत असं त्यांनी यावेळी सांगितलं.
भाजपासोबत आमची युती नाही. आम्ही इंडियाचा घटक पक्ष ही नाही. जे लोक आरोप लावतात की , आमचा पक्ष गुन्हेगारांचा पक्ष आहे. भाजपात किती गुन्हेगार आहे हे आम्ही पण सांगू शकतो. काही लोक आपली गुन्हेगारीची इमेज लपवण्यासाठी ते लोक भाजपमध्ये आहेत. अशी घणाघाती टीका देखील ओमी कलानी प्रवक्ते कमलेश निकम यांनी केली आहे. दोन दिवसांपूर्वी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत टीम ओमी कलानी समर्थक दोन नगरसेवक भाजपात गेले. त्यानंतर टीम ओमी कलानी सतर्क झाली. यापुढेही कोणत्याही प्रकारच्या दगा फटका होऊ नये यासाठी टीम ओमी कलानी समर्थकांनी रणनीती आखून शिवसेना शिंदे गटासोबत युती करण्याच्या निर्णय घेतला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world