KDMC News: पावसाळा अगदी तोंडावर आलेला असतानाही कल्याण डोंबिवलीतील यंत्रणा अजूनही सुस्त असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. करदात्या नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यासाठी नेमके काय नियोजन केले आहे, असा सवाल आता विचारला जात आहे. एका बाजूला पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई रखडलेली असताना, दुसरीकडे महापालिकेच्या मुख्य रुग्णालयात साधे प्लास्टर करण्याचे साहित्यही उपलब्ध नसल्याचे उघड झालंय. या कारभारामुळे सध्या महापालिकेच्या वर्तुळात प्रचंड गदारोळ सुरू असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे.
नालेसफाईवरून अधिकाऱ्याला थेट धमकी
कल्याण डोंबिवली महानगरपालिका (केडीएमसी) क्षेत्रात पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई व्यवस्थित व्हावी, म्हणून सध्या बैठकांचे सत्र सुरू आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या सभेत एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला. नालेसफाईच्या कामाची पाहणी करणाऱ्या महापालिका अधिकारी उमेश भट यांना एका कंत्राटदाराने थेट धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तुला जे काही करायचे ते कर, मला काही फरक पडत नाही, अशा भाषेत कंत्राटदाराने अधिकाऱ्याला सुनावल्याचे सभेत सांगण्यात आले. यावरून महापालिकेत कंत्राटदारांची मुजोरी किती वाढली आहे, हे स्पष्ट होते.
( नक्की वाचा : Kalyan News: कल्याणमध्ये खळबळ! क्लस्टर योजना अडवण्याची धमकी देऊन लाखो रुपये उकळले; थेट राजकीय नेत्यांवर गुन्हा )
कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
हा गंभीर विषय सभेत उपस्थित होताच भाजपाचे नगरसेवक दीपेश म्हात्रे आणि मंदार हळबे यांनी आक्रमक पवित्रा घेतला. सरकारी कामात अडथळा निर्माण करणाऱ्या आणि अधिकाऱ्यांना धमकावणाऱ्या अशा कंत्राटदारावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. एवढेच नाही तर नाल्यातून काढलेला गाळ आणि मळ उघड्या भूखंडांवर टाकला जात असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.
सामान्य नागरिकाने कचरा टाकल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करणारे प्रशासन, अशा कंत्राटदारांवर कारवाई का करत नाही, असा रोखठोक सवाल भाजपाच्या नगरसेवकांनी विचारला.
( नक्की वाचा : मुंबईत 25 लाखांची नोकरी, पण मराठी माणसाला बंदी? फक्त 2 समाजाला रेड कार्पेट... वाचा काय आहे सर्व प्रकार )
शिवसेनेकडून अधिकाऱ्यांची पाठराखण
दुसऱ्या बाजूला महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातील आरोग्याच्या दुरवस्थेचे वाभाडे काढण्यात आले. रुग्णालयात हाड मोडलेल्या एका रुग्णासाठी प्लास्टर करण्याची सुविधा आणि त्यासाठी लागणारे आवश्यक साहित्यही उपलब्ध नसल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. या मुद्द्यावरून भाजपने प्रशासनाला धारेवर धरले.
मात्र, आश्चर्यकारक बाब म्हणजे स्थायी समिती सभापती मल्लेश शेट्टी आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे लोकप्रतिनिधी या सभेत आरोग्य अधिकाऱ्यांची बाजू घेताना दिसले. आरोग्य अधिकाऱ्यांना शिवसेना पाठीशी घालत असल्याचे चित्र स्पष्टपणे समोर आल्याने रुग्णांच्या आरोग्यापेक्षा अधिकाऱ्यांचे हित महत्त्वाचे आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पत्रकारांना कव्हरेजसाठी बंदी, कारभारावर संशय
या संपूर्ण गदारोळात महापालिका प्रशासनाने एक वादग्रस्त पाऊल उचलले आहे. स्थायी समितीच्या या महत्त्वाच्या सभेचे वार्तांकन करण्यासाठी आलेल्या पत्रकारांना कव्हरेज करण्यास चक्क मनाई करण्यात आली. महापालिकेच्या कारभारातील त्रुटी आणि लोकप्रतिनिधींमधील वाद बाहेर पडू नयेत, म्हणूनच हा छुपा प्रयत्न केला गेला का, असा संशय आता व्यक्त केला जात आहे. नालेसफाईचा बोजवारा, रुग्णालयातील सुमार सुविधा आणि कंत्राटदारांची गुंडगिरी यामुळे केडीएमसीच्या कारभारावर आता सामान्य नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.