रेवती हिंगवे, पुणे
पुण्यातील खडकवासला-स्वारगेट-हडपसर- खराडी आणि नळस्टॉप-डहाणूकर कॉलनी-वारजे-माणिकबाग या दोन नव्या मेट्रो मार्गाला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. लवकरच या प्रकल्पाला केंद्र सरकार सुद्धा हिरवा कंदील दाखवेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आज दिनांक 14 ऑक्टोबर 2024 रोजी राज्य शासनाने पुणे मेट्रोच्या टप्पा 2 मधील खडकवासला - स्वारगेट - हडपसर - खराडी आणि नळ स्टॉप - वारजे - माणिकबाग या 31.64 किलोमीटर मार्गीकेला मान्यता दिली आहे. या मार्गिकांवर एकूण 28 स्थानके असणार आहेत. या दोन्ही मार्गिकांसाठी 9897.19 कोटी इतका खर्च लागणार आहे. राज्य शासनाच्या मान्यतेनंतर आज केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवला गेला आहे.
(नक्की वाचा - Mumbai Toll Tax Free : मुंबई टोलमुक्त, कोणत्या वाहनांना सूट मिळणार? प्रवाशांची किती बचत होणार?)
खडकवासला - स्वारगेट - हडपसर - खराडी या मार्गिकेची लांबी 25.518 किमी असून, या मार्गिकेवर 22 स्थानके असणार आहेत. या मार्गिकेसाठी 8131.81 कोटी इतका खर्च येणार आहे. तसेच टप्पा 2 मधील नळ स्टॉप - वारजे - माणिकबाग हा मार्ग 6.118 किमी असून त्यात 6 स्थानके असणार आहेत. या मार्गासाठी 1765.38 कोटी रुपये खर्च येणार आहे. हे दोन्ही मार्ग संपूर्ण उन्नत असणार आहेत.
( नक्की वाचा : सुपरफास्ट महायुती सरकार ! 1 तास 48 मिनिटांच्या बैठकीत झाले 80 निर्णय, कुणाचा होणार फायदा? )
महा-मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी याबाबत म्हटले की, "सध्या सिंहगड रस्ता, कर्वे रस्ता आणि सोलापूर रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी बघायला मिळत आहे. या मेट्रो मार्गिकांमुळे तेथील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच या भागातील नागरिकांना पिंपरी चिंचवड, रामवाडी, वनाझ आणि स्वारगेट इत्यादी ठिकाणी जलद व सुरक्षित प्रवास करणे शक्य होणार आहे."