"पंप म्हणजे किर्लोस्कर" हे समीकरण आज केवळ देशांतर्गत बाजारपेठेतच नाही, तर जागतिक पातळीवर आहे. एनडीटीव्ही मराठी मंचच्या 'नारी शक्ती महाराष्ट्राची!' या विशेष कार्यक्रमात किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडच्या कार्यकारी संचालिका रमा किर्लोस्कर यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी खापर पणजोबांपासून सुरू झालेल्या या 5 पिढ्यांच्या व्यावसायिक प्रवासावर, जागतिक विस्तारावर प्रकाश टाकला.
वाळवंटात शेती अन् ब्रिटनच्या बाजारपेठेवर पकड
रमा किर्लोस्कर यांनी कंपनीच्या जागतिक ब्रँड होण्यामागची काही महत्त्वपूर्ण उदाहरणे दिली. इजिप्तमधील नाईल नदीच्या क्षेत्रात कंपनीने तब्बल लाखो पंपांचा पुरवठा केला आहे. या पंपांच्या कार्यक्षमतेमुळे तेथील तब्बल 2 लाख हेक्टर जमीन ओलीताखाली आली आहे. ज्या वाळवंटी भागात शेती करणे अशक्य मानले जात होते, तिथे आज किर्लोस्करच्या तंत्रज्ञानामुळे शेती फुलली आहे. आज किर्लोस्कर ही ब्रिटनमध्ये सर्वाधिक पंप पुरवणारी कंपनी असून, तिथल्या बाजारपेठेतील तब्बल 80 टक्के शेअर एकट्या किर्लोस्करकडे आहे. कंपनी जागतिक ग्राहकांसाठी 'मेड इन अमेरिका' आणि 'मेड इन युरोप' दर्जाची उत्पादने देखील पुरवते, असं रमा किर्लोस्कर यांनी अभिमानाने सांगितलं.
पॉवर सेक्टर आणि 'आत्मनिर्भर भारत' अभियानात मोठे योगदान
किर्लोस्कर ब्रदर्स ही केवळ घरगुती किंवा शेती पंपांपुरती मर्यादित नसून ती देशाच्या संरक्षणात आणि ऊर्जा क्षेत्रात मोठी भूमिका बजावत आहे. भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमातील या ऐतिहासिक टप्प्यासाठी लागणारी सर्व मुख्य उपकरणे 'किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड'ने (KBL) पुरवली आहेत. कंपनी इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स, मरीन, डिफेन्ससह भारतीय आर्मी आणि नेव्हीसोबत अत्यंत महत्त्वाच्या प्रकल्पांवर काम करत आहे, असं देखील रमा किर्लोस्कर यांनी सांगितलं.
(नक्की वाचा- NDTV Marathi Manch: 'घरात कुणीही पोलीस नव्हते तरीही...'; IPS मोक्षदा पाटील यांनी उलगडला यशस्वी प्रवास)
किर्लोस्कर समूहाचा हा जागतिक प्रवास एका रात्रीत झालेला नाही, तर त्यामागे पाच पिढ्यांचे अपार कष्ट आणि दूरदृष्टी आहे. या कंपनीची सुरुवात माझ्या खापर पणजोबांनी केली होती. त्यानंतर प्रत्येक पिढीने व्यवसायात मोलाची भर घालत हा वारसा पुढे नेला. सध्या कंपनीची पाचवी पिढी या व्यवसायाचे यशस्वी नेतृत्व करत आहे, असं रमा किर्लोस्कर यांनी म्हटलं. "आम्ही भारतात बसून जगासाठी डिझाईन करतो आणि क्वालिटीमध्ये कधीही तडजोड करत नाही, कारण विश्वास हाच आमचा डीएनए आहे," असे रमा किर्लोस्कर म्हणाल्या.
घरातील प्रोग्रेसिव्ह विचार आणि एआयचे आव्हान'
या क्षेत्रात महिला म्हणून काम करताना कोणताही वेगळा त्रास किंवा चॅलेंज मला आले नाही, असे सांगत त्यांनी आपल्या कुटुंबाच्या प्रोग्रेसिव्ह विचारांचे कौतुक केले. कुटुंबात मुलगा आणि मुलगी असा भेद न करता नेहमी गुणवत्तेवर संधी दिली गेली. "आमचे उत्पादन बोलते, त्यामुळे कंपनी कोण चालवते याने ग्राहकाला फरक पडत नाही," असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
(नक्की वाचा- NDTV Marathi Manch: नारी शक्ती विधेयकाबाबत सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य, पुण्याला म्हणाल्या 'क्राईम कॅपिटल')
AI मुळे नोकऱ्या जाणार, पण...
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) मुळे भविष्यात नोकऱ्या जाणार हे वास्तव रमा किर्लोस्कर यांनी मान्य केले. मात्र, यामुळे लोकांना आपले स्कील अपग्रेड करावे लागेल. ज्यातून नव्या 'हाय-स्कील' नोकऱ्यांच्या संधी निर्माण होतील आणि त्यासाठी आपण तयार राहिले पाहिजे, असं देखील त्यांनी म्हटलं.
वर्क-लाइफ बॅलन्सवर रोकठोक मत
कामाच्या तासांबद्दल बोलताना त्यांनी स्वतः 'वर्कोहॉलिक' असल्याचे सांगितले. "जर तुम्हाला आयुष्यात एखादे मोठे ध्येय किंवा मोठे पद गाठायचे असेल, तर काम आणि वैयक्तिक आयुष्य यांचा परिपूर्ण समतोल ठेवून ते साध्य करता येत नाही. सर्वोच्च पदावर पोहोचलेल्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यातील एक मोठा वेळ त्यासाठी खर्च केलेला असतो. हे समजावून सांगताना त्यांनी ऑलिम्पिक विजेता स्वीमर मायकल फेल्प्स याचं उदाहरण दिलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world