Ladki Bahin Yojana: महिला सक्षमीकरण हे कोणत्याही राष्ट्राच्या विकासाचा पाया आहे आणि महिलांना अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग बनवल्याने देशाची आर्थिक स्थिती मजबूत होते, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. महिलांच्या 50 टक्के सहभागाशिवाय राष्ट्राचा सर्वांगीण विकास अशक्य असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी बचत गटांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यासाठी 10 जिल्ह्यांमध्ये 'बचत गट मॉल्स' तयार करण्यात येणार असल्याची घोषणा केली.
लाडकी बहीण योजना पुढील 5 वर्षांपर्यंत सुरु राहणार
मुंबईतील मुलुंड येथील महाकवी कालिदास नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या रक्षाबंधन उत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. 'लाडकी बहीण' योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जातात. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी ही योजना पुढील पाच वर्षे अखंडपणे सुरू ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, आमदार मिहीर कोटेचा यांच्यासह अनेक स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
( नक्की वाचा: मतदार चोरीवरून विखे-थोरात 'आमने-सामने', शिर्डीतील निकालाचा वाद काय? )
बचत गट मॉल्स आणि महिला सक्षमीकरणावर भर
मुख्यमंत्र्यांनी यावेळी बचत गटांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यासाठी 10 जिल्ह्यांमध्ये 'बचत गट मॉल्स' उभारण्याची घोषणा केली. या मॉल्समुळे बचत गटांमधील महिलांना त्यांच्या उत्पादनांसाठी एक मोठे बाजारपेठ उपलब्ध होईल आणि त्यांच्या व्यवसायाला चालना मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' सारख्या अनेक योजनांचा उल्लेख करत त्यांनी महिला सक्षमीकरणावर भर दिला. 'मुद्रा योजने'च्या एकूण लाभार्थ्यांपैकी 60 टक्के महिला आहेत, ज्यामुळे लाखो महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत झाली आहे, असेही ते म्हणाले.
( नक्की वाचा: घरी बसणाऱ्या नवऱ्याला जाब विचारणे जीवावर बेतले! सासरच्या छळाला कंटाळून पुण्यातील महिलेचा टोकाचा निर्णय )
'केजी टू पीजी'पर्यंत मोफत शिक्षण
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महिला सक्षमीकरणासाठी शिक्षणाचे महत्त्व अनमोल आहे. त्यामुळे राज्य सरकारने मुलींसाठी उच्च शिक्षण पूर्णपणे मोफत केले आहे. आता 'केजी टू पीजी' (KG to PG) पर्यंत मुली मोफत शिक्षण घेऊ शकतात. त्यामुळे शिक्षणात मुली मोठी प्रगती करत आहेत, ज्याचे उत्तम उदाहरण विद्यापीठांतील 'गोल्ड मेडल' मिळवणाऱ्या मुलींच्या वाढलेल्या संख्येतून दिसून येते.
'लखपती दीदी' योजनेअंतर्गत महाराष्ट्रात गेल्या वर्षी 25 लाख महिलांना 'लखपती दीदी' बनवण्याचे उद्दिष्ट साध्य झाले. यावर्षीही 25 लाख महिलांना आणि राज्यात एकूण 1 कोटी महिलांना 'लखपती दीदी' बनवण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी सर्व महिलांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देत, त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक रक्षणासाठी सरकार सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहील, अशी ग्वाही दिली.