जाहिरात

Vikhe vs Thorat : मतदार चोरीवरून विखे-थोरात 'आमने-सामने', शिर्डीतील निकालाचा वाद काय?

Vikhe vs Thorat : संगमनेरमधील काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिर्डी विधानसभा मतदारसंघातील मतदार नोंदणीच्या घोटाळ्यावर निशाणा साधला आहे.

Vikhe vs Thorat : मतदार चोरीवरून विखे-थोरात 'आमने-सामने', शिर्डीतील निकालाचा वाद काय?
Vikhe vs Thorat : थोरात-विखे पाटील पुन्हा आमने-सामने आले आहेत.
मुंबई:

सुनील दवंगे, प्रतिनिधी 

काँग्रेस नेते तथा लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तीन राज्यांमधील मतदान चोरीचा आरोप करत निवडणूक आयोगावर हल्लाबोल चढवला. त्यावरून देशभरातील वातावरण ढवळून निघालं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. लोकसभा अधिवेशनात राहुल गांधी यांनी शिर्डी मतदारसंघातील मतदार घोटाळ्याचा आरोप केला होता.  संगमनेरमधील काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिर्डी विधानसभा मतदारसंघातील मतदार नोंदणीच्या घोटाळ्यावर निशाणा साधला आहे. यावरून थोरात-विखे पाटील पुन्हा आमने-सामने आले आहेत.

काय आहे प्रकरण?

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील महाराष्ट्रासह मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या शिर्डी विधानसभा मतदारसंघात मतदार नोंदणी घोटाळा झाल्याचा आरोप केला. या आरोपावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आणि देशात लोकसभेच्या जागा, बोगस मतदानाने निवडून आल्या का? असा प्रश्न मंत्री विखे पाटलांनी गांधी आणि थोरात यांना करत पलटवार केला. 

( नक्की वाचा : Supriya Sule: उद्धव ठाकरे दिल्लीत आणि सुप्रिया सुळेंनी घेतली PM मोदींची भेट! कारण काय? )
 

थोरात म्हणाले, "राहुल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे निवडणूक आयोगाने देणे आवश्यक आहे. मात्र चोरी ओळखली गेल्याने भारतीय जनता पक्ष (BJP) अस्वस्थ झाला. मूळ विषयाला बगल देऊन उलट-सुलट बोलणे मुख्यमंत्री पदाला शोभणारे नाही. निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने निरनिराळे फंडे वापरले". निवडणूक आयोगाने डिजिटल सॉफ्ट कॉपी दिली असती, तर अनेक मतदारसंघाची तपासणी करता आली असती, असेही थोरात यांनी म्हटले.

थोरात विरुद्ध विखे

'राहुल गांधी आणि त्यांच्या टीमने सहा महिने बारकाईने अभ्यास करून हा सगळा प्रकार समोर आणलाय. निवडणूक आयोगाने भाजपला मदत करण्यासाठी हेतूपरस्पर अनेक गोष्टी केल्यात. हा लोकशाहीला खरा धोका आहे. संगमनेर मतदारसंघाबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे जी माहिती मागितली ती दिली गेली नाही. आमच्या मनातही अनेक शंका आहेत. शिर्डी मतदारसंघातही हजारो मतदारांची नोंदणी वाढवून घोटाळा झाला. निवडणूक आयोगाकडे तक्रार करूनही कोणतीच कारवाई झाली नाही', असा आरोप काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केला.

(नक्की वाचा : वडील आणि मुलासाठी काँग्रेस सोडावी लागणारे राधाकृष्ण विखे-पाटील भाजपाचे पॉवरफुल मंत्री कसे बनले? )
 

 गांधी आणि थोरातांच्या या आरोपांवर भाजप मंत्री राधाकृष्ण विखे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, "राहुल गांधी आणि काँग्रेसचे नेते स्वतःचे अपयश झाकण्यासाठी बेताल बोलत आहेत. तेलंगणात त्यांचे सरकार आल्यावर बोगस मतदान झाल्याचा आरोप केला का? कर्नाटकचे काँग्रेस सरकार बोगस मतदानामुळे आले का? काँग्रेसला लोकसभेच्या जागा बोगस मतदानाने मिळाल्या का? लोकांना यांचा खरा चेहरा समजल्याने त्यांना विधानसभेला यश मिळाले नाही."

'लोकांनी महाविकास आघाडीला धुडकावून लावले. अनेक प्रस्थापित नेते पराभूत झाले. याला तुम्ही बोगस मतदान म्हणणार असाल, तर हा मतदारांचा अपमान आहे. राहुल गांधी भारतात कमी आणि परदेशात जास्त बोलतात. बोगस मतदानाबाबत शपथपत्र केले, तर आरोप सिद्ध करावे लागतील. राहुल गांधींवर गुन्हा दाखल होऊन सदस्यत्व रद्द होऊ शकते. बेताल वक्तव्याने जनतेचे मनोरंजन होईल. मात्र राहुल गांधींना कुणीही गांभीर्याने घेत नाही', असाही टोला मंत्री विखे पाटलांनी लगावला.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com