Lalbagh Raja : एक पाय गरीबाचा, एक पाय श्रीमंताचा; लालबागच्या चरणी भेदभाव; संतापजनक Video

लालबाग राजा मंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून भाविकांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीवर संताप व्यक्त केला जातो. याशिवाय व्हिआयपी आणि सर्वसामान्यांच्या रांगाबद्दलही लोकांच्या मनात रोष आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

लालबागच्या राजाच्या दर्शनाला (Lalbagh Rajacha Darshana) केवल राज्यातूनच नाही तर देशभरातून भाविक येत असतात. लालबाग मंडळाचे हे 91 वे वर्ष आहे. नवसाला पावणारा राजा अशी लालबागच्या राजाची ओळख असली तरी गेल्या काही वर्षात अनेक कारणांमुळे लालबाग सार्वजनिक गणेश मंडळ वादात अडकलं आहे.  लालबाग राजा मंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून भाविकांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीवर संताप व्यक्त केला जातो. याशिवाय व्हिआयपी आणि सर्वसामान्यांच्या रांगाबद्दलही लोकांच्या मनात रोष आहे. यापूर्वी अनेकदा मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी भाविकांना धक्काबुक्की आणि गैरवर्तन केल्याच्या घटना आहे. दरम्यान यंदाच्या वर्षी तीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या व्हिडिओमुळे भाविकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. 

पहिला व्हिडिओ...
पहिल्या व्हिडिओमध्ये व्हिआयपी आणि सर्वसामान्यांसाठीच्या दोन रागांमधील फरक दिसत आहे. जिथं व्हिआयपी दर्शनासाठी आलेल्या भाविकांना बाप्पाचं दर्शन घेण्याबरोबरच फोटोसेशन करायला पुरेसा वेळ दिला जातो. तर दुसरीकडे दहा-बारा तास तर कधी दिवसभर रांगेत उभ्या राहणाऱ्या भाविकांना बाप्पााच्या पायावर डोकंही ठेऊ देत नाही. शेजारी उभी असलेली बाऊंसर भाविकांना धक्का देत राहते. हा व्हिडिओ पाहून लोकांनी संताप व्यक्त केला आहे. देवाच्या चरणी भेदभाव का केला जातो? असा सवाल उपस्थित केलाय. तर काहींनी थेट अशा ठिकाणी जाऊ नये असा सल्लाच दिला आहे. 

दुसरा व्हिडिओ....
बिझनेसमन हर्ष गोएंका यांनीही एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये धक्काबुक्की करीत नागरिकांना रांगेत सोडलं जात आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना त्यांनी एक सवाल उपस्थित केला आहे. ते म्हणतात, लालबागच्या राजाच्या दर्शनाला लोक व्हिआयपी दर्शनाचा पर्याय का निवडतात, याचा कधी विचार केलाय का? येथे सर्वसामान्य भक्तांना नेहमी मोठ्या रांगेत उभं राहावं लागलं, हा भेदभाव आहे. श्रद्धा, विश्वास सर्वांसाठी समान मानला जात नाही का?

तिसऱ्या व्हिडिओमध्ये प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री सिमरन बुधरूप हिला धक्काबुक्की झाल्याचं दिसून येत आहे. याबाबत तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. मंडळाच्या महिला बाऊंसरने अभिनेत्रीच्या  आईच्या हातातून फोन खेचून घेतला. यावेळी सिमरन आपल्या आईची मदत करीत होती, तेव्हा बाऊन्सरने तिलाही धक्का दिला. अभिनेत्री हा प्रकार शूट करीत असताना तिच्या हातातून फोन खेचून घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेवर अभिनेत्रीने संताप व्यक्त केला आहे. तिच्या या पोस्टला मोठा प्रतिसाद मिळत आहे. लालबाग राजाच्या कर्मचाऱ्यांबद्दल लोकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.