राकेश गुडेकर, रत्नागिरी
रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील अस्तान धनगरवाडी येथील रस्त्यावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. मातीचा पूर्ण ढिगारा रस्त्यावर आला. सोमवारी रात्री ही दरड कोसळल्याची माहिती समोर येत आहे.
या घटनेमुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. अस्तान गावातील पुरबिल धनगरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही दरड कोसळली आहे. या ठिकाणी झालेल्या रस्त्याच्या कामामुळे ही दरड कोसळल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
(वाचा - आधी वाटलं अपघात मग लक्षात आला घातपात, सुनेनेच 300 कोटींसाठी सासऱ्याविरोधात आखला डाव)
गेल्या काही दिवसांपूर्वी खेड तालुक्यातील अस्तान परिसरात रस्त्याचे काम करण्यात आले होते. यावेळी झालेल्या कामामुळे हा मातीचा ढिगारा रस्त्यावर कोसळल्याचे बोलले जात आहे. या घटनेत कोणतेही नुकसान झाले नसून केवळ रस्त्यावर मातीचा ढिगारा आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
(वाचा - प्रेयसी-प्रियकराचे कडाक्याचे भांडण, त्याने तिला निर्जनस्थळी नेऊन केले भयंकर कृत्य)
ढिगारा अद्याप हटवण्यात आला नसून हा ढिगारा हटवताना वरून मोठ्या प्रमाणात माती घसरण्याचा अंदाज स्थानिकांकडून वर्तवण्यात येत आहे. या मार्गावरील वाहतूक देखील सुरळीत सुरू असून खेड तालुका प्रशासन याकडे लक्ष ठेवून आहे. या घटनेची माहिती मिळताच खेड तालुका प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.