Palghar Kelwa Dam Incident Today : पालघरच्या झांजरोळी येथे असलेल्या धरणाच्या खालील भागातील भराव खचल्यामुळे झांजरोळीसह परिसरातील गावांमधील नागरिकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झालं आहे.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ.इंदु राणी जाखड स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून प्रशासनामार्फत धरणातील पाण्याचा प्रवाह आणि विसर्गावर सातत्याने लक्ष ठेवले जात आहेत.तात्पुरत्या तातडीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजने अंतर्गत धरण परिसरात धूप रोखण्यासाठी आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी गोण्या व दगडांच्या साहाय्याने मजबुतीकरणाचे काम सुरू आहे.
65 कुटुंबांचे स्थलांतर सुरू
पाण्याचा प्रवाह आणखी वाढल्यास अतिरिक्त विशेष सुरक्षा उपाययोजना आणि आपत्कालीन व्यवस्था तात्काळ करण्यात येणार आहेत. प्रभावित क्षेत्रातील ओळख करण्यात आलेल्या आठ गावांपैकी चार गावे अतिसंवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. या गावांमध्ये जवळपास 130 कुटुंबे असून त्यापैकी 65 कुटुंबांतील 200 जणांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे,तर उर्वरित 65 कुटुंबांचे स्थलांतर सुरू आहे.
नक्की वाचा >> मुंबई-पुणे वाहतूक पूर्णपणे ठप्प? मिसिंग लिंकवर दरड कोसळली, किती वेळात वाहतूक पूर्ववत होणार?
नागरिकांनी सतर्क राहा
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी एनडीआरएफची टीम परिसरात तैनात करण्यात आली असून स्थलांतर प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे. जिल्हा प्रशासन, जलसंपदा विभाग,पोलीस विभाग, महसूल विभाग तसेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा संयुक्तपणे परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहन करण्यात आले आहे.