Latur News : होत्याचं नव्हतं झालं! रात्रीतून दीड एकरवरील सोयाबीन जळून खाक, कर्जाचा डोंगर वाढला; शेतकरी चिंतेत

अल्पभूधारक शेतकऱ्याने कर्जाच्या बळावर जिद्दीने पिकवलेले सोयाबीन अज्ञात व्यक्तीने मध्यरात्री जाळून टाकल्याने त्यांचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

त्रिशरण मोहगावकर, लातूर

Farmer's soybeans burned : नियतीने आणि माणसाच्या क्रूरतेने घात केल्याची एक हृदयद्रावक घटना लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील गोथळा येथे घडली आहे. व्यंकटी सागर कोदळे (रा. गोताळा, ता. अहमदपूर) या अल्पभूधारक शेतकऱ्याने कर्जाच्या बळावर जिद्दीने पिकवलेले सोयाबीन अज्ञात व्यक्तीने मध्यरात्री जाळून टाकल्याने त्यांचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. ​ही घटना ५ नोव्हेंबर २०२५ च्या मध्यरात्री घडली, जेव्हा व्यंकटी कोदळे यांच्या शेतातील सोयाबीनचा संपूर्ण ढिग अज्ञात व्यक्तीने पेटवून दिला.

​सोयाबीनसाठी काढले होते लाखो रुपयांचे कर्ज...
​या घटनेने व्यंकटी कोदळे यांचे केवळ आर्थिकच नव्हे, तर मानसिक कंबरडे मोडले आहे. व्यंकटी कोदळे यांच्याकडे स्वतःची फक्त दीड एकर एवढीच जमीन आहे. त्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत नसल्याने, त्यांनी शेती वाढवण्यासाठी मोठा निर्णय घेतला. त्यांनी इतर शेतकरी यांची सात एकर जमीन वर्षासाठी बटाईने (वहून खाण्यासाठी) घेतली होती आणि त्यासाठी दीड लाख रुपये इतका मोठा मोबदला दिला होता.

​स्वतःची दीड एकर आणि बटाईने घेतलेली सात एकर अशा एकूण साडेआठ एकर जमिनीवर त्यांनी दिवस-रात्र कष्ट करून सोयाबीनचे पीक घेतले. यात त्यांनी मोठा खर्च केला होता. कष्टाने पिकवून शेतात सुरक्षित ठेवलेले सुमारे सात बॅग सोयाबीन पूर्णपणे जळून खाक झाले आहे. ​ज्या पिकावर कुटुंबाची दिवाळी आणि वर्षभराचा बटाईचा खर्च, कर्जाचे हप्ते तसेच कुटुंबाचे भवितव्य अवलंबून होते, ते पीक क्षणार्धात राख झाले आहे. शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ​बटाईसाठी कर्ज काढून जमीन घेतली, तिथं पीक पिकवलं. आता पीकच जळालं. बटाईचे पैसे कसे फेडायचे? माझ्या घरात आता फक्त अंधार आणि कर्जाचा डोंगर उरला आहे," अशी हृदय पिळवटून टाकणारी प्रतिक्रिया व्यंकटी कोदळे यांनी दिली.

Advertisement

नक्की वाचा - Mumbai airport : 13 किलो ड्रग्स, 87 लाखांचं परकीय चलन; मुंबई विमानतळावर 4 दिवसात 5 मोठी कारवाई

​गुन्हा दाखल;पोलिसांचा पंचनामा 
​या गंभीर घटनेनंतर व्यंकटी कोदळे यांनी तातडीने अहमदपूर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. याची तातडीने पोलीस प्रशासनाकडून दखल घेऊन बिट अंमलदार चिमनदरे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करीत आहेत. ​अज्ञात व्यक्तीने केलेल्या या क्रूर कृत्यामुळे संपूर्ण गोताळा गावावर शोककळा पसरली असून, प्रशासनाने तातडीने पंचनामा करून, या गरीब शेतकऱ्याला त्वरित आर्थिक मदत करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Topics mentioned in this article