अविनाश पवार, प्रतिनिधी
Pune Leoprad Video Viral : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात बिबट्याचा वावर पुन्हा एकदा समोर आला आहे.कर्डेलवाडी येथे शेतकरी रेवणनाथ कर्डिले यांच्या गोठ्यात शिरून बिबट्याने बांधलेल्या कुत्र्यावर हल्ला केल्याची घटना घडली.या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाने तातडीने कारवाई करावी,अशी मागणी जोर धरत आहे.मिळालेल्या माहितीनुसार,ही घटना रात्रीच्या सुमारास घडली. बिबट्याने थेट गोठ्यात प्रवेश करून कुत्र्यावर हल्ला केला. हल्ल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून ग्रामस्थांनी तत्काळ वनविभागाला माहिती दिली.
गेल्या काही वर्षांपासून उत्तर पुणे जिल्ह्यात बिबट्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे.विशेषतः जुन्नर, आंबेगाव,शिरूर आणि खेड तालुक्यांमध्ये बिबट्यांच्या हालचाली वाढल्या आहेत.आंबेगाव तालुक्यातील पिंपरखेड येथे काही महिन्यांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्यानंतर मोठे जनआंदोलन उभे राहिले होते.त्यानंतर वनविभागाने बिबट्यांना पकडण्याची मोहीम हाती घेतली असून आतापर्यंत शंभरहून अधिक बिबटे जेरबंद करण्यात यश आले आहे.
नक्की वाचा >> Kalyan News: भाजप पदाधिकाऱ्यासह वडिलांवर जीवघेणा हल्ला, 6 आरोपींची नेवाळी भागात काढली धिंड, प्रकरण काय?
काही भागांमध्ये बिबट्यांची दहशत कायम
तथापि,या कारवाईनंतरही शिरूर तालुक्यातील काही भागांमध्ये बिबट्यांची दहशत कायम आहे.पिंपरी दुमाला आणि परिसरातही पाळीव प्राण्यांवर हल्ल्यांच्या घटना सातत्याने समोर येत आहेत.अनेक शेतकऱ्यांच्या गोठ्यातील वासरे,शेळ्या आणि कुत्र्यांवर बिबट्यांनी हल्ले केल्याचे प्रकार वाढले आहेत.यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून शेतीची कामे करणेही कठीण बनले आहे.नागरिकांनी वारंवार वनविभागाकडे पिंजरे लावून बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी केली आहे.
— Naresh Shende (@NareshShen87640) April 23, 2026
दरम्यान,वनविभागाकडून तंत्रज्ञानाच्या मदतीने उपाययोजना करण्याचा प्रयत्न सुरू आहे.बिबट्याचा वावर आढळलेल्या भागात सायरनद्वारे नागरिकांना सतर्क करण्याची योजना आखली जात आहे.मात्र या योजनेची परिणामकारकता किती असेल,याबाबत ग्रामस्थांमध्ये साशंकता आहे.सध्या ग्रामीण भागात भीतीमुळे नागरिक अंधार पडल्यानंतर घराबाहेर पडणे टाळत आहेत.अनेक ठिकाणी संध्याकाळी सातनंतर जणू अघोषित कर्फ्यू असल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. नजीकच्या काळात वनविभागाने ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजना करून बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांवर नियंत्रण मिळवावे, अशी अपेक्षा स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world