योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Akola Leoprad News Today : अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील बटवाडी बु.येथील शेतशिवारात बिबट्या दिसल्याची माहिती समोर आल्यानंतर वन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली. शेतकरी कार्तिक महेंद्र आखरे यांच्या तीन एकर केळी बागेत बिबट्या असल्याचे निदर्शनास आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.दरम्यान,वनपरिक्षेत्र अधिकारी भागतराम कटीयार आणि गजानन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक एस.एस.तायडे,एन.एस.साळवे,वाहन चालक यशपाल इंगोले आणि सहकारी तुषार आवारे यांनी कडक उन्हात केळी बागेची पाहणी करत बिबट्याचा शोध घेतला. मात्र अनेक तास शोधमोहीम राबवूनही बिबट्या प्रत्यक्ष दिसून आला नाही.
हरणाची शिकार आणि पायांचे ठसे आढळले
शोधमोहिमे दरम्यान वन विभागाच्या पथकाला केळी बाग परिसरात हरणाचे अवशेष आढळून आले. बिबट्याने हरणाची शिकार केल्याचा प्राथमिक अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे. यासोबतच ओलसर जागी बिबट्याच्या पायांचे ठसे देखील स्पष्टपणे दिसून आले.त्यामुळे या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे.मागील वर्षभरापासून बटवाडी, तामसी,चिंचोली गणू,पिंपळगाव तसेच मन नदीच्या काठावरील दाट झाडाझुडपांच्या परिसरात बिबट्या अधूनमधून दिसत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.त्यामुळे शेतकरी,शेतमजूर आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेकजण आता एकटे शेतात जाणे टाळत आहेत.
नक्की वाचा >> Sindhudurg News: देवगडच्या 'त्या' समुद्र किनाऱ्यावर स्थानिकांसह पर्यटक हादरले, मुंबईच्या तरुणांसोबत भयानक घडलं
वन विभागाचे नागरिकांना आवाहन
यादरम्यान,परिस्थिती लक्षात घेता वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.शेतात किंवा फळबागांमध्ये कामासाठी जाताना शक्यतो समूहाने जावे.तसेच केळी बाग किंवा दाट झाडीच्या भागात प्रवेश करण्यापूर्वी फटाके फोडून वन्यप्राण्यांना बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा करून द्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे.याशिवाय कोणत्याही प्रकारचा वन्यप्राणी आढळल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा,असे रेस्क्यू अधिकारी तथा वनरक्षक एस.एस.तायडे यांनी सांगितले.दरम्यान,पाळीव प्राण्यांवरही बिबट्याचे हल्ले झाल्याच्या घटना समोर आल्याने ग्रामस्थांनी वन विभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा,अशी मागणी केली आहे.