गुरुप्रसाद दळवी, प्रतिनिधी
Sindhudurg Viral News Today : मिठमुंबरी बागवाडी समुद्रकिनारी पोहण्यासाठी गेलेल्या पाच तरुणांपैकी एक जण पाण्यात बुडाला असून तिघांना वाचविण्यात स्थानिक मच्छिमारांना यश आले आहे. यातील चैतन्य राजेंद्र गुरव (22) असं पाण्यात बडालेल्या तरुणाचे नाव आहे. तर सोहम जयेश मंडोद (20) याची प्रकृती चिंताजनक असून त्याला जामसंडे येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दोघेही दादर नायगाव येथील रहिवासी आहेत. ही घटना रविवारी सायंकाळी 5.45 वाजताच्या सुमारास घडली.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनूसार,मूळ देवगड ब्राम्हणदेववाडी येथे राहणारा यश राजेंद्र उपरकर (21) हा दादर नायगाव येथे वास्तव्यास आहे. त्याचे मित्र ओम दिपक चव्हाण (17),चैतन्य राजेंद्र गुरव, सोहम जयेश मंडोद आणि अर्णव राजेश तारी (20) यांच्यासमवेत तो सुट्टीनिमित्त देवगड येथे गावी आला होता.रविवारी सायंकाळच्या सुमारास हे पाचही जण मिठमुंबरी बागवाडी येथील समुद्रकिनारी पोहण्यासाठी गेले होते.
नक्की वाचा >> Pandharpur News: विठ्ठलाचं आषाढ महिन्यात VIP दर्शन बंद राहणार, सरकारचा मोठा निर्णय
चौघेजण पोहण्यासाठी समुद्राच्या पाण्यात उतरले अन्..
यश उपरकर हा किनाऱ्यावर राहीला.तर उर्वरीत चौघेजण पोहण्यासाठी समुद्राच्या पाण्यात उतरले.पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने हे चारही जण बुडू लागले.त्यांनी स्वत:ला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला.यावेळी तेथिल स्थानिक रमेश मनोहर तारी, लक्ष्मण मनोहर तारी,मनिष रमेश तारी,बाबुराव धुरी आणि बाळा राजम यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
यातील बाबूराव धुरी व बाळा राजम यांनी नौकेच्या सहाय्याने बुडणाऱ्या तरुणांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ओम चव्हाण, सोहम मंडोद,अर्णव तारी यांना वाचवून किनाऱ्यावर आणले.यातील सोहम मंडोद हा बेशुध्द अवस्थेत असल्याने त्याला कृत्रिम श्वासोच्छवास देत त्याला शुध्दीवर आणण्यात आले.परंतू यादरम्यान चैतन्य गुरव हा पाण्यात दिसेनासा झाला.यावेळी स्थानिक मच्छिमारांना नौकांच्या सहाय्याने पाण्यात त्याचा शोध घेतला परंतू सायंकाळी उशिरापर्यंत तो सापडला नाही.
नक्की वाचा >> Palghar News : 16 वर्षांपूर्वीच्या खून प्रकरणातील फरार आरोपीचा खळबळजनक व्हिडीओ आला समोर, पोलिसही अडचणीत
पर्यटकांची सुरक्षा ऐरणीवर
दरम्यान, प्रकृती चिंताजनक असलेल्या सोहम मंडोद याला तात्काळ खाजगी वाहनाने देवगड ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले.अधिक उपचारासाठी त्याला जामसंडे येथील खासगी रूग्णालयात नेण्यात आले.घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष भालेराव,स.पो.उपनिरिक्षक प्रवीण सावंत,पो.कॉ.प्रसाद आचरेकर यांनी घटनास्थळी भेट देवून घटनेची माहिती जाणून घेतली.घटनेची माहिती परिसरात पसरताच स्थानिकांनीही घटनास्थळी गर्दी केली होती.
या घटनेतील तरुण यश उपरकर यांनी सांगितलं की,सुट्टी एन्जॉय करण्यासाठी माझे मुंबईतील मित्र गावी आले होते.पोहण्यासाठी आम्ही सर्वजण मिठमुंबरी बागवाडी समुद्रकिनारी आलो होतो. मित्रांना मी समुद्रात पोहण्यासाठी जावू नका, असे सांगत होतो.तरीही ते पाण्यात उतरले व ही दुर्दैवी घटना घडली.चैतन्य गुरव याला चांगले पोहता येत होते.तरीही तो पाण्यात बुडाला अशी माहिती स्थानिकांनी दिली. सध्याचा पर्यटन हंगामात मोठ्या प्रमाणात पर्यटक देवगड तालुक्यातील पर्यटनस्थळांवर दाखल झाले असून समुद्रकिनाऱ्यावरही पर्यटकांची उच्चांकी गर्दी दिसत आहे.मिठमुंबरी बागवाडी समुद्रकिनारी घडलेल्या घटनेदरम्यान तेथेही पर्यटकांची गर्दी होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world