Loksabha Election 2024 : मुंबईत निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, लाखोंची रक्कम जप्त

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर मुंबईत मोठी कारवाई करण्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबईत निवडणूक आयोगानं कारवाई करत मोठी रक्कम जप्त केलीय. (प्रतिकात्मक फोटो)
मुंबई:

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर मुंबईत मोठी कारवाई करण्यात आली आहे. घाटकोपरच्या पंतनगरमध्ये 70 लाखांपेक्षा जास्त रोकड जप्त करण्यात आलीय. इलेक्शन सेलच्या 'स्टॅटिक सर्विलेन्स स्कॉड' नं ही कारवाई केलीय. या पथकानं केलेल्या कारवाईत एका गाडीतून 72 लाख 39 हजार 675 रुपये जप्त केले आहेत.

या प्रकरणात दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्यामधील एक जण सीए तर दुसरा इन्कमटॅक्स प्रॅक्टिसनर आहे. एका बांधकाम व्यवसायिकाकडून ही रक्कम पाठवण्यात आली होती, अशी प्राथमिक माहिती समोर आलीय. पंतनगर पोलीस आणि निवडणूक आयोगाचे विशेष पथक याबाबत अधिक तपास करत आहे.

निवडणुकीच्या दरम्यान हिंसंक घटनांना कोणताही थारा देण्यात येणार नाही, असा इशारा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिला होता. हिंसाचारासंबंधीची कोणतीही तक्रार 100 मिनिटांमध्ये दूर करण्यात येईल. त्यासाठी सुरक्षेचा चोख बंदोबस्त करण्यात आलाय. गुन्हेगारांवर बारीक लक्ष ठेवलं जात आहे. देशाच्या सीमेवर ड्रोननं टेहाळणी करण्यात येईल. आत्तापर्यंत 3400 कोटी रुपये पैसा जप्त करण्यात आलाय. काही राज्यांमध्ये पैशांचा वापर जास्त प्रमाणात होतो, असंही त्यांनी सांगितलं होतं.

'आमची पूर्ण तयारी झाली आहे. भारतीय लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवासाठी आम्ही सज्ज आहोत. जागतिक पातळीवर भारताचा गौरव वाढेल या पद्धतीनं निवडणुका करु, असं आश्वासन त्यांनी निवडणुकांच्या तारखा जाहीर करताना दिलं होतं. त्यानंतर देशभर निवडणूक आयोगाचं विशेष पथक सक्रीय झाले आहेत. त्यानुसार मुंबईत ही कारवाई करण्यात आली आहे.

Topics mentioned in this article