- राहुल तपासे, प्रतिनिधी
Mahabaleshwar News: पर्यटकांचे आकर्षण असलेल्या ऐतिहासिक प्रतापगड परिसरातील एक अतिशय हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. गुरुवारी (23 एप्रिल) संध्याकाळी बाइकवरून प्रवास करणारे दाम्पत्य तब्बल 900 फूट खोल दरीत कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. हे दाम्पत्य वाई बावधन नाका परिसरातील रहिवासी होती. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
तब्बल 8 तासांनंतर सापडला मृतदेह
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित दाम्पत्य गुरुवारी संध्याकाळी आपल्या बाइकवरून प्रतापगडकडे निघाले होते. घाटमार्गातील एका वळणावर अचानक बाइकचा ताबा सुटल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. यामुळे बाइक संरक्षक कठड्याला धडकून आणि थेट सुमारे 900 फूट खोल दरीत जाऊन कोसळल्याचे म्हटलं जातंय. या मार्गावरून जाणाऱ्या ट्रेकर्सना खाली बाइक पडलेली दिसली. त्यांनी तत्काळ दरीत उतरून शोध घेतला असता, हा भीषण प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच महाबळेश्वर पोलीस आणि स्थानिक बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पण रात्रीची वेळ, मुसळधार पाऊस आणि दाट धुक्यामुळे मदतकार्यात मोठे अडथळे निर्माण झाले.
(नक्की वाचा: Beed News: "ज्याच्या कपाळी नाही टिळा, त्याच्याकडून खरेदी टाळा"; लेन्सकार्ट शोरूमविरोधात हिंदू संघटनेचा आक्रमक)
रात्रीच्या अंधारात मृतदेह बाहेर काढणे अत्यंत जोखमीचे असल्याने रात्री उशीरा बचावकार्य थांबवण्यात आले होते. तब्बल आठ तासानंतर महिलेचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले.
Photo Credit: NDTV Marathi
(नक्की वाचा: VIDEO: मला हिंदू मुली आवडतात म्हणत कंपनीतील तरुणीला पाठवायचा अश्लील मेसेज, मुंबईत टेलिकॉलरचा विकृतपणा उघड)
पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
शुक्रवारी (24 एप्रिल) सकाळी पुन्हा एकदा स्थानिक ट्रेकर्स, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि पोलिसांच्या मदतीने शोधमोहीम युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे. उभे कडे आणि निसरड्या वाटेमुळे हे काम अत्यंत कठीण झाले आहे. या घटनेमुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महाबळेश्वर पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली असून हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला की चालकाची चूक होती? याचा अधिक तपास पोलीस करत आहेत. या दुर्घटनेमुळे वाई आणि महाबळेश्वर परिसरात शोककळा पसरली आहे.