- आकाश सावंत, प्रतिनिधी
Beed News: बीड शहरात एका वेगळ्याच कारणावरून वातावरण चांगलेच तापले होते. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या सुभाष रोड परिसरातील 'लेन्सकार्ट'च्या (Lenskart) शोरूमवर सकल हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी धडक दिली आणि दुकानाला टाळे ठोकले. दुकानाच्या बाहेर "ज्याच्या कपाळी नाही टीळा, त्याच्याकडून खरेदी टाळा" अशा आशयाचे बॅनर्स लावण्यात आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
बीडमधील हे प्रकरण नेमके काय आहे?
लेन्सकार्ट कंपनीच्या 'ड्रेस कोड' नियमावलीवरून हा वाद निर्माण झाला आहे. हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांचा असा आरोप आहे की, कंपनीच्या धोरणामध्ये हिंदू संस्कृतीला डावलले जात आहे. या संदर्भात बोलताना कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत विचारले की, "जर कंपनीच्या नियमावलीत हिजाब चालतो मग टिकली का चालत नाही?"
(नक्की वाचा: VIDEO: मला हिंदू मुली आवडतात म्हणत कंपनीतील तरुणीला पाठवायचा अश्लील मेसेज, मुंबईत टेलिकॉलरचा विकृतपणा उघड)
हिंदू संघटनेचा आक्रमक इशारा
या घटनेनंतर संतप्त कार्यकर्त्यांनी दुकानात काम करणाऱ्या एका हिंदू कर्मचाऱ्याच्या हातात स्वतः धागा बांधला आणि आपला निषेध नोंदवला. जोपर्यंत कंपनी आपली ही 'हिंदू विरोधी' समजली जाणारी ड्रेस कोडची नियमावली बदलत नाही, तोपर्यंत हे दुकान उघडू दिले जाणार नाही, असा इशारा सकल हिंदू संघटनेने दिला आहे. आक्रमत होत सकल हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दुकानाच्या दर्शनी भागात "बॉयकॉट लेन्सकार्ट" चे बॅनर्स लावले आहेत.
(नक्की वाचा: Nagpur News: लग्नाचे आमिष, अल्पवयीनचे लैंगिक शोषण आणि बालविवाह! एका कारवाईने उघडले नराधमाचे काळे कारनामे)
कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनानेही याकडे लक्ष केंद्रित केले आहे. कंपनीकडून यावर काय प्रतिक्रिया येते किंवा हा वाद कसा निवळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world