महायुती-महाविकास आघाडीचा खेळ बिघडणार? या छोट्या पक्षांची भूमिका ठरणार निर्णायक

 महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातच मुख्य लढत होणार आहे. मात्र काही छोटे पक्ष आहेत जे महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हींची डोकेदुखी वाढवू शकतात. मनोज जरांगे फॅक्टर, प्रकाश आंबेडकर यांचा  वंचित बहुजन आघाडी आणि राज ठाकरे फॅक्टर यंदाच्या निवडणुकीत निर्णायक ठरू शकतो.

जाहिरात
Read Time: 3 mins

राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे.विधानसभेच्या सर्व 288 जागांवर एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.  महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातच मुख्य लढत होणार आहे. मात्र काही छोटे पक्ष आहेत जे महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हींची डोकेदुखी वाढवू शकतात. मनोज जरांगे फॅक्टर, प्रकाश आंबेडकर यांचा  वंचित बहुजन आघाडी आणि राज ठाकरे फॅक्टर यंदाच्या निवडणुकीत निर्णायक ठरू शकतो.

मनोज जरांगे यांचा एन्गार

मराठा आरक्षणासाठी प्रदीर्घ काळ लढा देणारे मनोज जरंगे पाटील यांनी महायुतीला सत्तेवर येऊ देणार नसल्याची घोषणा केली आहे. कुणबी प्रमाणपत्रासाठी आम्ही वारंवार उपोषण आणि आंदोलने केली मात्र सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, असे त्यांचं म्हणणं आहे. मनोज जरांगे राज्यात मोठी युती करण्याच्या तयारीत आहेत. फक्त मराठेच नाही तर मुस्लीम, दलित आणि शेतकरी यांना एकत्र करून महायुती सरकार पाडू, असंही त्यांनी म्हटलं आहे.

मनोज जरांगे यांचा मराठवाड्यावरील प्रभाव

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उभारलेल्या आंदोलनामुळे मनोज जरांगे यांची मराठा समाजावर चांगली पकड निर्माण झाल्याचे बोलले जाते. तरुणांमध्ये त्यांची चांगली लोकप्रियता आहे. यंदाच्या निवडणुकीत ते मराठवाडाच्या अनेक जागांवर प्रभाव टाकू शकतात. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातील सर्व जागा भाजपने जिंकल्या होत्या. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला या भागात पराभवाला सामोरे जावे लागले होते. भाजपचे अनेक ज्येष्ठ नेतेही या भागात निवडणूक हरले. 

मनोज जरांगे MIM सोबत युती करु शकतात

विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच छोट्या पक्षांमध्येही युतीची चर्चा जोरात सुरु झाला आहे. एमआयएमने मनोज जरांगे यांना युतीची ऑफर दिली आहे. इम्तियाज जलील यांनी मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे यांच्याशी युती करण्याचे संकेत दिले आहेत. अंतरवली सराटीमध्ये इम्तियाज जलील यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली होती. याचा फटका महायुती आणि महाविकास आघाडीला देखील बसू शकतो. 

वंचितचा महाविकास आघाडीला धोका 

मनोज जरांगे महायुतीसाठी धोका ठरू शकतात. तर प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीसाठी डोकेदुखी ठरु शकते. लोकसभा निवडणुकीतही शेवटच्या क्षणी  चर्चा फिस्कटल्याने प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीसोबत न येण्याचा निर्णय घेतला होता. मात्र प्रकाश आंबेडकरांना लोकसभा निवडणुकीत फारसा प्रभाव पाडता आला नाही. त्यांच्या पक्षाने 38 जागांवर निवडणूक लढवली होती परंतु केवळ 2 जागांवर त्यांचे उमेदवार त्यांचे डिपॉझिट वाचवण्यात यशस्वी ठरले. खुद्द प्रकाश आंबेडकर अकोला लोकसभा मतदारसंघात पराभूत झाले होते. मात्र, लोकसभेच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीचे मुद्दे आणि निकाल वेगळे असू शकतात, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. 

राजकीय पक्ष मतांचा टक्केवारी (2019)
भाजप 25.75%
शिवसेना 16.41%
काँग्रेस 15.87%
राष्ट्रवादी काँग्रेस 16.71%
वंचित बहुजन अघाड़ी (VBA) 4.57%
मनसे 2.25%

2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी वंचितने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांची अडचण केली होती. मात्र, गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत समीकरणे बरीच बदलली आहेत. लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहता प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाला लोकसभा निवडणुकीत फारशी कामगिरी करता आली नसली तरी त्यांच्या स्वतंत्र लढण्याचा परिणाम दिसून येतो. 

राज ठाकरेंचा स्वबळाचा नारा 

राज्यात काही ठिकाणी राज ठाकरे यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही प्रभावी ठरला आहे. मात्र, त्यांना कोणत्याही निवडणुकीत चांगले यश मिळाले नाही. लोकसभा निवडणुकीदरम्यान राज ठाकरे यांच्या पक्षाने महायुतीला पाठिंबा जाहीर केला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांनी 200 ते 225 जागांसाठी स्वबळावर तयारी सुरु केली आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचा एकच आमदार जिंकू शकला. पण राज्यभरात मिळालेल्या अंदाजे दोन टक्के मतांचा परिणाम इतर पक्षांच्या उमेदवारांच्या विजयावर किंवा पराभवावर झाला.