राज्याचा अर्थसंकल्प आज उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत मांडला. अजित पवार यांनी तुकाराम महाराजांच्या अंभगाने अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात केली. दिंड्या आणि वारकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आल्या. याशिवाय अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यातील महिला सक्षमीकरणासाठी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' या योजनेची घोषणा केली आहे.
राज्यातील महिला आणि मुलींना स्वावलंबी, आत्मनिर्भर करण्यासाठी तसेच महिला आणि त्यांच्यावर अबलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची ही महत्त्वपूर्ण योजना आहे.
महिलांना दरमाह 1500 रुपये मिळणार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांतील महिलांच्या बँक खात्यात प्रतिमाह 1500 रुपये जमा होणार आहेत. 21 ते 60 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे. कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांपेक्षा कमी असणार्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. येत्या जुलै महिन्यापासून या योजनेला सुरुवात होणार आहे.
अर्थसंकल्पातील इतर मोठ्या घोषणा
- मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना, या योजनेअंतर्गत सर्वांना सिलेंडर परवडेल यासाठी पात्र कुटुबियांना दरवर्षी 3 मोफत सिलेंडर देण्याची घोषणा. राज्यातील जवळपास 52 लाख 16 हजार कुटुबियांना या योजनेचा लाभ होईल.
- महिला बचत गटांसाठी उलवे नवी मुंबई येथे युनिटी मॉल बांधण्यात येणार. महिला बचत गट आणि कारागिरांना उत्पादनांच्या प्रदर्शनांसाठी व्यासपीठ उपलब्ध होणार
- महिला लघु उद्योजकांसाठी यावर्षी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजना सुरु करणार.
- महिला आणि बालकांविरोधातील गुन्ह्यात खटला जलद गतीने चालण्यासाठी 100 विशेष जलदगती न्यायलयांना निधी उपलब्ध करुन देणार.
- मुलींसाठी मोफत शिक्षण; कुटुंबाचं उत्पन्न 8 लाखांपर्यंत असणाऱ्या मुलींना मोफत शिक्षण मिळणार.