Maharashtra Budget 2025 : राज्यात 2024 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला दमदार यश मिळालं होतं. या निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. महायुती सरकारच्या या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. अजित पवार यांनी सादर केलेला हा अकरावा अर्थसंकल्प आहे. देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हापासून त्यांचं मुंबईच्य़ा विकासावर लक्ष आहे. या अर्थसंकल्पातही मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुंबईला बजेटमध्ये काय मिळालं?
7 आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापार केंद्र
मुंबईमध्ये सात आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापारी केंद्रे निर्माण करण्याची सर्वात मोठी घोषणा अजित पवार यांनी केली आहे. नवी मुंबईसह, वडाळा, खारघरमध्ये बीकेसीप्रमाणेच व्यापारी केंद्रे उभारली जातील. त्यामुळे मुंंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक विकास केंद्र म्हणून विकसीत होणार आहे.
कुर्ला, नवी मुंबई, वांद्रे-कुर्ला संकुल, खारघर व विरार - बोईसर या सात ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापार केंद्रे निर्माण केली जाणार आहेत. यामुळे मुंबईची अर्थव्यवस्था 14 बिलीयन डॉलरवरुन 2030 पर्यंत 300 बिलीयन डॉलर होईल, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. नवी मुंबईत 250 एकरावर इनोव्हेशन सिटी उभारणार आहे. रतन टाटा राज्य कौशल्य विद्यापीठाकडून मायक्रोसॉफ्ट कडून 10 हजार महिलांना कौशल्य आणि कृत्रिम बुद्धीमत्ता याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी यावेळी केली.
( नक्की वाचा : Budget 2025: सागरी दळणवळणात महाराष्ट्र 'महाशक्ती' ठरणार; अर्थसंकल्पात अजित पवारांच्या मोठ्या घोषणा )
तिसरं विमानतळ
पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर हे 2030 पर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष्य असल्याचं अर्थमंत्र्यांनी जाहीर केलं. हे बंदर जेएनपीटीच्या तिप्पट असणार असून जगातील पहिल्या 10 बंदरांमध्ये याचा समावेश असेल. 300 दशलक्ष मेट्रिक टन वार्षिक माल हाताळणी क्षमता निर्माण होणार आहे.
वाढवण जवळ मुंबईतील तिसरं विमानतळ उभारणार असल्याची घोषणा देखील अजित पवार यांनी केली. तसंच मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला तिथं स्टेशन देण्यात येणार असून ते विमानतळाही जोडले जाणार आहे.
वाहतूक कोंडी कमी करणार
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी 64 हजार कोटींचा प्रस्ताव असल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली. त्याचबरोबर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम 85 टक्के पूर्ण झालं आहे, असं त्यांनी सांगितलं. मुंबई उपनगरातील वाहूतक जलद करण्यावर या अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे. त्यामध्ये वर्सोवा ते मढ खाडीपूल, वर्सोवा ते भाईंदर किनारी मार्ग, मुलुंड ते गोरेगाव, ठाणे ते बोरिवली, ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्ग असे 64 हजार 783 कोटींचे प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत.
त्याचबरबोर ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा उन्नत मार्ग नियोजित आहे. ठाणे, डोंबिवली, कल्याण ही महत्त्वाची शहरं आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडण्यात येणार आहेत. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील खोपोली ते खंडाळा या घाटातील मिसिंग लिंक ऑगस्ट 2025 पर्यंत पूर्ण केली जाणार आहे.