दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही...पदभार स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवारांची अजित पवारांबाबत पहिली प्रतिक्रिया

Sunetra Pawar News: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सर्व खात्यांचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी अजित पवार यांच्याबद्दल पहिली प्रतिक्रिया दिलीय.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Maharashtra Deputy CM Sunetra Pawar: सुनेत्रा पवार यांची अजित पवारांसाठी पहिली पोस्ट"
DCM Sunetra Pawar X

Sunetra Pawar News: पती आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या 13 दिवसांनंतर सुनेत्रा पवार यांनी मंगळवारी (10 फेब्रुवारी) उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. यावेळेस उपमुख्यमंत्री कार्यालयामध्ये त्यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांच्याव्यतिरिक्त त्यांचा मुलगा पार्थ पवारही उपस्थित होते. 31 जानेवारी रोजी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. 

सर्व खात्यांचा पदभार स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर केलीय. सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट शेअर करत म्हटलंय की" आज महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारत असताना विश्वासाची, कर्तव्याची आणि त्यागाची जाणीव सुद्धा आहे. मा. अजितदादांनी आयुष्यभर महाराष्ट्राच्या जनतेसाठी झटत विकासाचा जो ध्यास घेतला, तोच माझ्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ आहे. दादांची कार्यशैली, निर्णयक्षमता आणि लोकांशी असलेले आत्मीय नाते, हेच बळ घेऊन मी पुढील वाटचाल करणार आहे. त्यांच्या अपूर्ण स्वप्नांना पूर्णत्व देणे, शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देणे, हीच माझी प्राथमिकता असेल. दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही; पण त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा आणि अधिक सक्षम महाराष्ट्र घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी नक्की करेन. या कठीण प्रसंगी जनतेने दिलेले प्रेम, आधार आणि विश्वास हेच माझे सामर्थ्य आहे. त्यांच्या स्मृतीपुढे आज मी एकच वचन देते की, महाराष्ट्राच्या हितासाठी निष्ठेने आणि समर्पणाने कार्य करत राहीन"

(नक्की वाचा: Sharad Pawar Health News: पंतप्रधान मोदींचा शरद पवारांना फोन; पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये नेमकं काय घडतंय?)

पदभार स्वीकारण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी दादर येथे चैत्यभूमीवर जाऊन भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. 

(नक्की वाचा: Sharad Pawar Health Update: शरद पवारांच्या आजाराचं खरं कारण समोर, सूत्रांची मोठी माहिती; सुनेत्रा पवारही भेटीला)

चैत्यभूमीपूर्वी त्यांनी प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराचे दर्शन घेतले.  

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचंही म्हटलं जातंय.