Ganesh Chaturthi 2025: सरकारने जाहीर केली नवी स्पर्धा, 5 लाखांचे बक्षीस; कशी कराल नोंदणी?

Ganpati Decoration Competition 2025: : प्रत्येक जिल्ह्यातून एक यानुसार एकूण 44 शिफारसी राज्यस्तरीय परीक्षणासाठी स्वीकारल्या जातील.

जाहिरात
Read Time: 2 mins
Ganesh Chaturthi 2025: या स्पर्धेमध्ये पहिल्या विजेत्याला पाच लाखांचे बक्षीस मिळणार आहे (Photo Credit- Gemini AI)

Ganesh Chaturthi 2025: सांस्कृतिक कार्य विभागाच्या  पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने 'महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2025' चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत नोंदणीकृत संस्था किंवा परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे सहभागी होऊ शकतात. या स्पर्धेचा अर्ज पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबईच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या ऑनलाईन पोर्टलद्वारेच  20 जुलैपासून  20 ऑगस्ट 2025 पर्यंत स्वीकारण्यात येतील असे संचालक मिनल जोगळेकर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. 

( नक्की वाचा: गणेशोत्सव आता 'राज्य उत्सव'... शेलारांची मोठी घोषणा ) 

स्पर्धेचे निकष काय आहेत?

ही स्पर्धा निःशुल्क असून सांस्कृतिक कार्यक्रम, सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन, संस्कृतीचे जतन व संवर्धन याकरिता राबविण्यात आलेले उपक्रम, गडकिल्ले यांचे जतन व संवर्धन, राष्ट्रीय व राज्य स्मारके, धार्मिक स्थळे यांविषयी जनजागृकता तसेच जतन व संवर्धन, विविध सामाजिक उपक्रम व कार्ये, पर्यावरणपूरक मूर्ती, पर्यावरणपूरक सजावट, ध्वनिप्रदूषण रहित वातावरण, गणेशभक्तासाठी केलेल्या सोयी सुविधा यांच्या आधारे केलेल्या कार्याचा गौरव व्हावा आणि असेच समाजाभिमुख उपक्रम अधिकाधिक घडावेत म्हणून प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. याच निकषांच्या आधारे स्पर्धेचे परीक्षण केले जाईल.

( नक्की वाचा:गणपतीला कोकणात जाणाऱ्यांसाठी Good News! )

स्पर्धेसाठीचे परीक्षण कधी होणार?

27 ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयांनी गठीत केलेली जिल्हास्तरीय समिती या स्पर्धेत सहभागी मंडळे किंवा संस्थांच्या उत्सवस्थळाला भेट देतील आणि जिल्हास्तरीय परीक्षण पूर्ण करतील.  प्रत्येक जिल्ह्यातून एक यानुसार एकूण 44 शिफारसी राज्यस्तरीय परीक्षणासाठी स्वीकारल्या जातील. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी  जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

विजेत्यांना किती रुपयांचे बक्षीस मिळणार?

राज्यस्तरीय परीक्षणात प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे पाच लाख, दोन लाख  पन्नास हजार आणि एक लाख रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. अन्य जिल्हास्तरीय प्रथम विजेत्यांना  पंचवीस हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. या स्पर्धेत अधिकाधिक संख्येने सहभाग नोंदवण्याचे आवाहनही सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केले आहे.
 

Advertisement