अजिंक्य धायगुडे-पाटील, पुणे
Heat Wave News: उन्हाळा वेळेआधीच तीव्र होताना दिसत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यातील तापमानाने पस्तिशी ओलांडली असून आता हवामान विभागाने पुढील दोन दिवस राज्यातील 18 जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा (Heat Wave) इशारा दिला आहे. कमाल तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
कोकण आणि मुंबई परिसर: पालघर, ठाणे, मुंबई.
उत्तर महाराष्ट्र: धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक.
पश्चिम महाराष्ट्र: अहिल्यानगर.
मराठवाडा: छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, लातूर.
विदर्भ:अकोला, अमरावती, वर्धा.
(नक्की वाचा- Iran US-Israel War: इराणवर नवं संकट! तेहरानमध्ये काळ्या पावसाने नागरिकांचं आरोग्य धोक्यात)
अकोला आणि अमरावतीत 18 मार्चपर्यंत लाट
राज्यातील बहुतांश भागात ही लाट बुधवारपर्यंत असेल, मात्र विदर्भातील अकोला आणि अमरावती या दोन जिल्ह्यांमध्ये ही उष्णतेची लाट अधिक काळ म्हणजे 18 मार्चपर्यंत सक्रिय राहणार आहे. या भागात तापमानाचा पारा सरासरीपेक्षा 4 ते 5 अंशांनी जास्त राहण्याची शक्यता आहे.
(नक्की वाचा- रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे अजितदादांच्या विमानाला अपघात? भाजपची मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी)
काय काळजी घ्यावी?
- पुरेसे पाणी प्या, शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होऊ देऊ नका.
- दुपारी 12 ते 3 या वेळेत शक्यतो कडक उन्हात बाहेर जाणे टाळा.
- सुती आणि सैल कपडे वापरा, बाहेर जाताना छत्री किंवा टोपीचा वापर करा.
- लहान मुले आणि ज्येष्ठांनी विशेष काळजी घ्यावी, कारण त्यांना उष्माघाताचा (Heat Stroke) त्रास लवकर होऊ शकतो.
उष्ण व दमट वाऱ्यांचा प्रवाह वाढल्याने आर्द्रतेत वाढ झाली आहे, ज्यामुळे तापमानात मोठी वाढ नोंदवण्यात येत आहे. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यातच ही परिस्थिती निर्माण झाल्याने यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र राहण्याचे संकेत मिळत आहेत.