जाहिरात

रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे अजितदादांच्या विमानाला अपघात? भाजपची मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी

Pune News: रोहित पवार यांच्या शेठफळ गडे येथील साखर कारखान्यातून निघणाऱ्या धुरामुळे बारामती विमानतळ परिसरात प्रदूषणाची पातळी वाढून विमान अपघाताची शक्यता भाजप युवा मोर्चाचे वैभव सोलनकर व्यक्त केली आहे.

रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे अजितदादांच्या विमानाला अपघात? भाजपची मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी

देवा राखुंडे, बारामती

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय वातावरण तापले आहे. भाजप युवा मोर्चाने थेट रोहित पवार यांच्या संबंधित साखर कारखान्यावर गंभीर आरोप केले आहेत. कारखान्यातून निघणाऱ्या धुरामुळे दृश्यमानता कमी होऊन हा अपघात झाला असावा का, असा संशय व्यक्त करत सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

भाजप युवा मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांनी या अपघाताचा संबंध आमदार रोहित पवार यांच्याशी संबंधित साखर कारखान्यातून निघणाऱ्या धुराशी जोडला असून, या प्रकरणाची तांत्रिक चौकशी करण्याची मागणी केली आहे.

(नक्की वाचा-  LPG Cylinder Price Hike: महागाईचा भडका! व्यावसायिक सिलेंडर 115 रुपयांनी महाग; घरगुती गॅस दरातही मोठी वाढ)

मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातील प्रमुख मुद्दे

वैभव सोलनकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात शेठफळ गडे येथील साखर कारखान्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाकडे लक्ष वेधले आहे. स्थानिक नागरिकांना श्वसनाचे आजार, डोळ्यांची जळजळ आणि त्वचेच्या तक्रारी जाणवत असून शेतीवरही याचा परिणाम होत आहे. अपघाताच्या दिवशी परिसरात धुरामुळे दृश्यमानता  कमी होती का? औद्योगिक उत्सर्जनामुळे कृत्रिम धुके तयार झाले होते का? याची वैज्ञानिक तपासणी होणे आवश्यक आहे. कारखान्याचा धूर विमानतळावर अडथळा ठरतो की नाही, याचे सादरीकरण स्वतः रोहित पवार यांनी द्यावे, असे आव्हान सोलनकर यांनी दिले आहे.

सोलनकर यांनी काय मागणी केली?

  1. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) मार्फत तात्काळ संयुक्त तपासणी करून उत्सर्जन मर्यादांचे पालन होते का याची खात्री करावी.
  2. कारखान्यातील बॉयलर, चिमणी व फिल्टर यंत्रणेची कार्यक्षमता आणि ऑनलाइन मॉनिटरिंग प्रणालीचे (OCEMS) मागील ६ महिन्यांचे रेकॉर्ड तपासण्यात यावेत.
  3. अपघाताच्या दिवशीचे हवामान खाते, DGCA व स्थानिक प्रशासनाचे दृश्यता (visibility) अहवाल सार्वजनिक करण्यात यावेत.
  4. तज्ज्ञ पर्यावरण शास्त्रज्ञ, विमान सुरक्षा तज्ञ व हवामान तज्ज्ञांचा समावेश असलेली स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्यात यावी.
  5. परिसरातील नागरिकांची आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करून अधिकृत वैद्यकीय अहवाल तयार करावा.
  6. जर कोणतेही नियमभंग, पर्यावरणीय उल्लंघन किंवा सुरक्षा धोक्याचे कारण आढळल्यास तात्काळ दंडात्मक व कायदेशीर कारवाई करावी.
  7. चौकशी अहवाल निश्चित कालमर्यादित (उदा. ३० दिवसांत) जाहीर करून पारदर्शकता राखावी.

(नक्की वाचा-  Shivneri Bus: मुंबई-पुण्यानंतर राज्यभर धावणार 'शिवनेरी'! 'या' 8 नवीन मार्गांवर सुरू होणार सेवा)

साखर कारखान्याचा धूर, अन् परिणाम

सोलनकर यांनी पुढे काही प्रश्न उपस्थित केले आणि तज्ज्ञांकडून याबाबत जी माहिती मिळाली ते देखील सांगितले.

1. साखर कारखान्याचा धूर किती लांब जाऊ शकतो आणि त्याचे तोटे काय?

साखर कारखान्याचा धूर किती लांब जाईल हे वाऱ्याचा वेग, दिशा आणि हवेतील आर्द्रता यावर अवलंबून असते. सामान्यतः हा धूर 10  ते 15 किलोमीटर पर्यंत सहज पसरू शकतो, परंतु त्यातील अतिसूक्ष्म कण वाऱ्यासोबत अधिक लांबवरही जाऊ शकतात.  या थुरामध्ये राखेचे कण आणि कार्बन डायऑक्साइड असतो, ज्यामुळे श्वसनाचे विकार, दमा आणि डोळ्यांची जळजळ होऊ शकते. राखेचे कण पिकांच्या पानांवर साचल्यामुळे प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेत अडथळा येतो, ज्यामुळे पिकांची वाढ खुंटते. धुरातील सल्फर आणि नायट्रोजनच्या ऑक्साईड्‌समुळे पावसाच्या पाण्यात मिसळून 'आम्ल पर्जन्य होण्याची शक्यता असते.

2. पहाटेच्या धुरामुळे हवेत काय तयार होते?

पहाटेच्या वेळी वातावरणाचे तापमान कमी असते. अशा वेळी कारखान्यातून निघणार गरम धूर  जेव्हा थंड हवेच्या संपर्कात येतो, तेव्हा 'स्मॉग' तयार होतो, म्हणजेच धुके आणि धूर (Smoke + Fog). कारखान्यातील धूर आणि राखेचे पहाटे धुकं असलं की कण या धुक्यात अडकतात. यामुळे जमिनीलगत एक दाट राखाडी थर तयार होतो. ज्यामुळे प्रदूषित हवा वर न जाता जमिनीलगतच साठून राहते. यामुळे दृश्यमानता कमालीची कमी होते.

(नक्की वाचा-  Vasai News: नागरिकांच्या जीवाशी खेळ! भाजप नगरसेवकांची वसई पालिकेच्या रुग्णालयावर धाड, धक्कादायक वास्तव उघड)

3. एअरपोर्टपासून 17 किमी अंतरावरील कारखान्याचा विमान लैंडिंगवर परिणाम होतो का?

17 किमी अंतर असले तरी तांत्रिकदृष्ट्‌या काही विशिष्ट परिस्थितीत याचा परिणाम होऊ शकतो. विमान लँडिंगसाठी 'रनवे स्पष्ट दिसणे आवश्यक असते. जर वाऱ्याची दिशा एअरपोर्टच्या बाजूने असेल आणि पहाटेचा 'स्मॉग' तयार झाला असेल, तर 17 किमीवरील धूर लँडिंगच्या मार्गावर अडथळा ठरू शकतो.  दाट धुरामुळे धावपट्टीचे दिवे किंवा खुणा स्पष्ट दिसत नाहीत, ज्यामुळे लँडिंगला उशीर होऊ शकतो किंवा विमान डायव्हर्ट करावे लागू शकते. धुरातील राखेचे कण विमानाच्या इंजिनसाठी दीर्यकाळात हानिकारक ठरू शकतात, जरी 17 किमीवर त्याचे प्रमाण कमी असले तरी. थोडक्यात सांगायचे तर 17 किमी हे अंतर विमानासाठी खूप जास्त नाही, जर हवामान खराब असेल किंवा वारे कारखान्याकडून विमानतळाकडे वाहत असतील, तर निश्चितच दृश्यमानतेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com