महाराष्ट्रातील जुन्या वाहनधारकांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP Plate) पाटी बसवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने आता 30 जून 2026 पर्यंत अंतिम मुदतवाढ दिली आहे.
मुदतवाढ देण्याचे मुख्य कारण काय?
यापूर्वी शासनाने एचएसआरपी बसवण्यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंतची मुदत दिली होती. मात्र, दिलेल्या मुदतीमध्ये राज्यातील केवळ 50 टक्के जुन्या वाहनांवरच ही सुरक्षा नंबर प्लेट बसवण्यात आल्याचे परिवहन विभागाच्या निदर्शनास आले. अजूनही अर्ध्याहून अधिक वाहनांना नंबर प्लेट बसवणे बाकी असल्याने, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी शासनाने ही मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
(नक्की वाचा- LPG Cylinder: घरातील सिलेंडर 25 दिवसांच्या आत संपला तर काय कराल? 3 पर्याय ठरतील फायदेशीर)
1 जुलै 2026 पासून थेट दंडात्मक कारवाई!
सह परिवहन आयुक्त शैलेश कामत यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहनधारकांनी या संधीचा लाभ घेणे आवश्यक आहे. जे वाहन मालक निर्धारित मुदतीत म्हणजेच 30 जून 2026 पर्यंत आपल्या वाहनांवर एचएसआरपी बसवणार नाहीत किंवा त्यासाठी ऑनलाइन वेळ (अपॉईंटमेंट) घेणार नाहीत, अशा वाहनांची 1 जुलै 2026 पासून रस्त्यावर कडक तपासणी करण्यात येणार आहे.
तपासणी दरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि जुनी नंबर प्लेट वापरणाऱ्या वाहनधारकांकडून मोटार वाहन कायदा व नियमांनुसार 1000 रुपये तडजोड शुल्क आकारण्यात येईल.
(नक्की वाचा- Beed News: लेकरं बसमध्ये अन् आई प्रियकरासोबत फरार; खिशात ठेवली चिठ्ठी, तर आजोबांचा प्रश्न ऐकून पोलीस चक्रावले)
घरबसल्या अशी घ्या ऑनलाईन अपॉईंटमेंट
वाहनधारकांना कोणत्याही त्रासाशिवाय ही नंबर प्लेट मिळवता यावी, यासाठी परिवहन विभागाने ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. वाहन मालकांनी त्वरित परिवहन विभागाच्या transport.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन आपली अपॉईंटमेंट निश्चित करावी, असे आवाहन सह परिवहन आयुक्त शैलेश कामत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.