Nagarparishad Result 2025 : मुंबईच्या मोहात ठाकरेंनी बालेकिल्ले गमावले; नगरपालिका निकालातून धोक्याची घंटा

Nagarparishad Elections Result 2025 : उद्धव ठाकरेंसाठी नगरपालिका निवडणुकांचे निकाल म्हणजे एक मोठा धोक्याचा इशारा मानला जात आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Nagarparishad Elections Result 2025 : या नगरपालिका निवडणुकीत उतरताना ठाकरेंच्या शिवसेनेकडे कोणताही ठोस अजेंडा किंवा उद्दिष्ट नव्हते.
मुंबई:

Nagarparishad Elections Result 2025 : उद्धव ठाकरेंसाठी नगरपालिका निवडणुकांचे निकाल म्हणजे एक मोठा धोक्याचा इशारा मानला जात आहे. आगामी महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर असताना ठाकरेंचा बालेकिल्ला समजला जाणारा ग्रामीण महाराष्ट्र अक्षरशः उद्ध्वस्त झाला आहे. विशेष म्हणजे, ही लढाई सुरू होण्यापूर्वीच उद्धव ठाकरेंनी मैदानातून माघार घेतल्याचे चित्र निर्माण झाले होते, ज्याचा परिणाम आता निकालातून स्पष्टपणे समोर येत आहे.

ठाकरे मैदानात उतरलेच नाहीत

राज्यात नगरपालिका निवडणुकीची मोठी रणधुमाळी सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी या प्रक्रियेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. संपूर्ण निवडणुकीच्या प्रचारात उद्धव ठाकरे यांची एकही सभा झाली नाही. केवळ उद्धव ठाकरेच नव्हे, तर आदित्य ठाकरे यांनीही ग्रामीण महाराष्ट्रात जाऊन कार्यकर्त्यांना बळ देण्याचा प्रयत्न केला नाही. 

पक्षाचे सर्वोच्च नेतृत्वच मैदानात नसते, तेव्हा मधल्या फळीतील नेते आणि स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचा अभाव असणे स्वाभाविक होते. याच निरुत्साहाचा फटका ठाकरेंच्या शिवसेनेला बसला आहे.

( नक्की वाचा : Nanded Nagar Parishad Result 2025 : नांदेडमध्ये भाजपाचा मोठा जुगार अंगलट, एकाच घरातील 6 जण एकाच वेळी पडले! )

मुंबईच्या मोहापायी ग्रामीण महाराष्ट्र वाऱ्यावर

उद्धव ठाकरे यांनी आपले सर्व लक्ष केवळ मुंबई महापालिका निवडणुकीवर केंद्रित केले आहे. मुंबई हातची जाऊ नये या भीतीने ते मुंबईतच अडकून पडले आणि त्यांनी उर्वरित महाराष्ट्रातील पक्षसंघटनेकडे पाठ फिरवली. 

Advertisement

राज ठाकरे यांच्यासोबत युती करण्याच्या चर्चांमध्ये ते इतके व्यस्त राहिले की, ग्रामीण भागातील शिवसैनिकांना त्यांनी वाऱ्यावर सोडले. ज्या ग्रामीण महाराष्ट्राने एकेकाळी शिवसेनेला ताकद दिली, तिथला कार्यकर्ता आज नेतृत्वाच्या अभावामुळे हतबल झाला आहे.

निवडणुकीसाठी ठोस अजेंडा आणि व्हिजनचा अभाव

या नगरपालिका निवडणुकीत उतरताना ठाकरेंच्या शिवसेनेकडे कोणताही ठोस अजेंडा किंवा उद्दिष्ट नव्हते. निवडणूक नेमकी कोणत्या मुद्द्यांवर लढवायची, याबाबत पक्षाच्या गोटात प्रचंड संभ्रम होता. 

Advertisement

विधानसभेत केवळ 20 आमदार निवडून आल्यानंतर पक्ष पुन्हा उभा करण्याची संधी या निवडणुकीत होती, परंतु ठाकरेंनी ती गमावली आहे. भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि निलेश राणे यांनीही याच मुद्द्यावरून ठाकरेंवर टीका केली असून, ठाकरेंकडे कोणतेही व्हिजन नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

( नक्की वाचा : Ausa Nagar Parishad Result 2025 : फडणवीसांच्या 'खास' आमदाराचा 'होम ग्राऊंड'वर पराभव; औशात गुलाबी गुलालाची उधळण )
 

अस्तित्वाची लढाई आता मुंबईच्या मैदानात

पक्ष अनेक ठिकाणी कमी पडला असून सत्तेचा वापर करून विरोधकांनी विजय मिळवला, असं ठाकरेंच्या पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनीही मान्य केलं. मात्र, आता खरी परीक्षा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत असणार आहे. पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी नगरपालिका निवडणुका ही एक मोठी संधी होती, मात्र उद्धव ठाकरेंनी त्याकडे दुर्लक्ष केले. आता शिवसेना पक्षापेक्षाही उद्धव ठाकरेंचा जीव फक्त मुंबई महापालिकेतच अडकला आहे का, असा सवाल राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.
 

Advertisement