Mumbai Rain Updates: मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये काहीशी विश्रांती घेतलेला मान्सून शनिवारपासून (19 जुलै) पुन्हा सक्रिय झाला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा इशारा जारी केला असून नागरिकांनाही खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 21 जुलै रोजी मुसळधार पावसासह सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. गेल्या 24 तासांत मुंबईच्या उपनगरांमध्ये पावसाने जोरदार बॅटिंग केली असून अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.
- ऑरेंज अलर्ट: 21 जुलै रोजी मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी.
- रायगड : रायगड जिल्ह्याला 21 आणि 22 जुलै असे सलग दोन दिवस ऑरेंज अलर्ट.
- वादळी वाऱ्यांचा धोका: मंगळवारी (21 जुलै) ताशी 50 ते 60 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता.
मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये अतिवृष्टीचा अंदाज
हवामान विभागाने जारी केलेल्या पाच दिवसांच्या अंदाजानुसार, मुंबईसह कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे. 21 जुलै आणि 22 जुलै रोजी मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. विशेषत: 21 जुलैसाठी या तीनही जिल्ह्यांना 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. या काळात मुसळधार पावसासोबतच ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहतील, असा अंदाज असल्याने सखल भागात पाणी साचण्याची आणि झाडे पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
(नक्की वाचा: Health Tips: पावसाळ्यात कोणते पाणी पिणे योग्य? RO की उकळलेलं? डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला)
रायगडला दोन दिवस 'ऑरेंज अलर्ट'
रायगड जिल्ह्याला पावसाचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने रायगड जिल्ह्यासाठी पुढील दोन दिवस (21 जुलै आणि 22 जुलै ) अतिमुसळधार पावसाचा इशारा देत 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे.
(नक्की वाचा: Mumbai Water Supply: मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात! BMCकडून महत्त्वाचं आवाहन; नेमकी काय काळजी घ्याल?)
रत्नागिरी आणि सिंधुदुर्गची स्थिती काय?
मुंबई आणि उत्तर कोकणव्यतिरिक्त दक्षिण कोकणातही पावसाची संततधार पाहायला मिळेल.
रत्नागिरी: जिल्ह्याला 24 जुलैपर्यंत 'येलो अलर्ट' देण्यात आला असून, येथे बहुतांश भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल.
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 23 जुलै रोजी 'येलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे.