यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी
Maharashtra Monsoon Update: हवामान विभागाने राज्यातील जनतेसाठी आणि विशेषतः बळीराजासाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट दिले आहे. बहुप्रतीक्षित मान्सूनने अखेर महाराष्ट्रात एन्ट्री घेतली असून काही जिल्ह्यांमध्ये त्याचे रीतसर आगमन झाले आहे. देशात यंदा 4 जून रोजी दाखल झाल्यानंतर मान्सूनने आता राज्यातील काही भागात प्रगती केली आहे. येत्या काही दिवसांत तो उर्वरित महाराष्ट्रात देखील सक्रिय होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, पुढील 3 दिवसांसाठी राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मान्सून नेमका कुठे पोहोचला?
यंदाचा मान्सून अरबी समुद्राच्या काही भागांसह महाराष्ट्रातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये दाखल झाला आहे. याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्येही मान्सूनचे आगमन झाले आहे. हवामान विभागाचे प्रमुख डॉ. एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या 4 ते 5 दिवसांत मान्सून महाराष्ट्रातील आणखी काही भागांमध्ये पुढे सरकण्यासाठी अत्यंत अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.
( नक्की वाचा : Kharif Crop Planning: अल निनोच्या संकटात शेती वाचवणार 'हा' फॉर्म्युला; यंदाच्या खरिपात 'या' पिकांची करा निवड )
सध्या पडणारा पाऊस नेमका कसा?
राज्यात सध्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह जोराचा पाऊस होत आहे. मात्र, हा सर्व पाऊस मान्सूनचा नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर वगळता इतर ठिकाणी पडत असलेला पाऊस हा नैऋत्य मान्सूनचा नसून तो 'पूर्वमोसमी वादळी पाऊस' आहे.
या पूर्वमोसमी पावसामध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्याचा वेग देखील जास्त असणार आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान खात्याने राज्यातील अनेक भागांमध्ये पुढील 3 दिवसांसाठी 'यलो अलर्ट' जारी केला आहे.
( नक्की वाचा : Pune News : पुणेकरांवर पाणी कपातीचे संकट, सोमवारपासून लागू होणार नवे वेळापत्रक, 'या' गोष्टींवर निर्बंध! )
शेतकऱ्यांना महत्त्वाचा सल्ला
राज्यात मान्सूनचे आगमन झाले असले आणि अनेक भागांत पाऊस पडत असला, तरी हवामान विभागाने शेतकऱ्यांना एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. सध्या काही भागातच मान्सून पोहोचला असल्याने शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरणी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी राज्य शासन आणि कृषी विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे आणि पुरेशा ओलीची खात्री करूनच पेरणीचा निर्णय घ्यावा.
एल निनोचा धोका काय?
हवामान विभागाने आगामी काळातील मान्सूनच्या स्थितीवरही प्रकाश टाकला आहे. सध्या प्रशांत महासागरामध्ये 'एल निनो'ची परिस्थिती विकसित होत आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, जुलै महिन्यापर्यंत हा एल निनो पूर्णपणे सक्रिय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळातील पावसाच्या प्रमाणावर आणि वितरणावर याचा काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world