Monsoon 2026: आषाढीआधी महाराष्ट्रात धो-धो पाऊस! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना मुसळधारचा इशारा,वाचा नवा अंदाज

Monsoon 2026 Updates: महाराष्ट्रात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होणार असून 22 जुलैपासून राज्यात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे? वाचा सविस्तर हवामान अंदाज.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Monsoon 2026 Updates: महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा"
PTI

Monsoon 2026 Updates: गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या मान्सूनबाबत अखेर महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. आषाढी एकादशीच्या तोंडावर राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हवामान अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 जुलैपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार असून संपूर्ण महाराष्ट्रात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. या पावसामुळे चिंतेत असलेल्या बळीराजाला आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची चिन्हं आहेत.

बंगालच्या उपसागरात अनुकूल बदल; राज्यात पावसासाठी पूरक वातावरण

हवेतील बाष्पाचे वाढलेले प्रमाण आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गुरुवारी (16 जुलै) विदर्भ आणि उत्तर कोकणातील काही भागांत पावसाने चांगली हजेरी लावली. या वातावरणीय बदलांमुळे राज्यात पावसासाठी पूरक परिस्थिती तयार होत आहे.

Advertisement

सध्या अनेक भागांत पावसाने ओढ दिल्याने शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. शेत वाचवण्यासाठी शेतकरी चातकासारखी पावसाची वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत 22 जुलैच्या सुमारास बंगालच्या उपसागरात आणखी एक नवीन कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे. याचा सकारात्मक परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर दिसून येईल. 22 जुलै ते 25 जुलै या कालावधीत राज्यात ठिकठिकाणी चांगला पाऊस पडेल.

तुमच्या जिल्ह्यात हवामान कसे असेल? सविस्तर अंदाज:

कोकण आणि मुंबई परिसर: कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची दाट शक्यता आहे. तर पालघर, मुंबई आणि ठाणे परिसरात हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्र: नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पश्चिम महाराष्ट्र आणि घाटमाथा: पुणे, सांगली आणि कोल्हापूरमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सातारा, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यांच्या घाटमाथा परिसरात मध्यम पावसाचा जोर पाहायला मिळेल.

(नक्की वाचा: Pune News: लोणावळ्यात जाणाऱ्या पर्यटकांना मोठा दिलासा, लोहगडसह 'या' पर्यटनस्थळांबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय)

मराठवाडा आणि सोलापूर (यलो अलर्ट): सातारा, सोलापूर, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे.

विदर्भात वादळी वाऱ्यांसह इशारा: विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये ताशी 40 ते 50 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता असून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येथील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Advertisement

बळीराजाची प्रतीक्षा संपणार?

राज्यात काही जिल्ह्यांना हवामान विभागाकडून यलो अलर्ट देण्यात आला असला, तरी अनेक भागांत अद्यापही प्रत्यक्ष पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पण 22 जुलैपासून निर्माण होणारी नवी प्रणाली पाहता, महाराष्ट्रातील कोरड्या पडलेल्या भागांत लवकरच पाऊस पडेल आणि आषाढी एकादशीच्या तोंडावर संपूर्ण राज्य सुखावेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.