यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी
Pune lonavala Tourism News : लोणावळा ग्रामीण परिसरातील प्रमुख पर्यटनस्थळांवर लागू करण्यात आलेला भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम 163 अंतर्गत जमावबंदीचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी रद्द केला आहे.पावसाचा जोर कमी झाल्याने, परिस्थिती पूर्ववत होत असल्याने आणि जनजीवन सुरळीत झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयामुळे एकवीरा देवी मंदिर,कार्ला-भाजे लेणी,भाजे धबधबा,लोहगड,विसापूर,तिकोणा,तुंग किल्ले,टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट,शिवलिंग पॉईंट तसेच पवना धरण परिसरात जाणाऱ्या पर्यटकांना मोठा दिलासा मिळाला आहे.आता या पर्यटनस्थळांवरील निर्बंध हटविण्यात आल्याने पर्यटकांना पूर्वीप्रमाणे भेट देता येणार आहे.
नक्की वाचा >> Satara News: साताऱ्यातील 'या' प्रसिद्ध शाळेत विद्यार्थ्यांची पळापळ, काही जण गुदमरले, शिक्षकांनाही झाली बाधा
मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला
पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर होणारी पर्यटकांची गर्दी, वाहतूक कोंडी, धोकादायक ठिकाणी होणारी वर्दळ आणि संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने 6 जुलैपासून कलम 163 लागू केले होते. हा आदेश मूळतः 6 जुलै ते 31 ऑगस्ट 2026 या कालावधीसाठी लागू राहणार होता.मात्र,गेल्या काही दिवसांत पावसाचा जोर कमी झाला असून परिसरातील परिस्थिती स्थिर झाली आहे. याचा आढावा घेत जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी जमावबंदीचा आदेश मागे घेण्याचा निर्णय घेतला.
नक्की वाचा >> 3 वर्षांपूर्वी कुत्रा चावला..आता त्याने 18 मुलांना चावा घेतला, त्या सरकारी कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये घबराट
पर्यटकांनी सुरक्षिततेचे नियम पाळावे
त्यामुळे आगामी आठवड्याच्या शेवटी आणि सुट्टीच्या दिवशी लोणावळा परिसरातील पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.दरम्यान, प्रशासनाने पर्यटकांना पर्यटनाचा आनंद घेताना सुरक्षिततेचे नियम पाळण्याचे,धोकादायक ठिकाणी जाणे टाळण्याचे आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world