Vegetable Prices: सर्वसामान्यांना महागाईचा फटका! पाऊस ओसरताच भाजीपाला कडाडला; पाहा ताज्या दरांची यादी

Vegetable Prices: राज्यभरात मुसळधार पाऊस ओसरल्यानंतर बाजारात भाजीपाल्याची आवक प्रचंड घटल्यामुळे किमती गगनाला भिडल्या आहेत. किरकोळ बाजारात फरसबी 200 रुपये, वाटाणा 240 रुपये तर आले चक्क 280 रुपये किलोवर पोहोचल्याने सर्वसामान्यांचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins

राज्यभरात गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसाचा थेट फटका आता सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला बसू लागला आहे. मुसळधार पावसामुळे भाजीपाला उत्पादनाचे मोठे नुकसान झाले असून, मुख्य बाजारपेठांमध्ये भाजीपाल्याची आवक कमालीची घटली आहे. पाऊस ओसरल्यानंतर बाजारात ग्राहकांकडून भाजीपाल्याची मागणी अचानक वाढली, मात्र पुरवठा कमी असल्याने दरांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. 

नवी मुंबईतील एपीएमसी (APMC) मार्केटसह मुंबई आणि उपनगरातील किरकोळ बाजारात फरसबी 200 रुपये, वाटाणा 240 रुपये, तर आले 280 रुपये किलो या विक्रमी दरापर्यंत पोहोचले आहे. पुढील काही दिवस भाजीपाल्याचे हे कडाडलेले दर असेच तेजीत राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.

Advertisement

घाऊक आणि किरकोळ बाजारातील दरांमध्ये मोठी तफावत

बाजार समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यापर्यंत घाऊक बाजारात अवघी 24 ते 40 रुपये किलो मिळणारी भेंडी आता थेट 40 ते 80 रुपयांवर पोहोचली आहे. किरकोळ बाजारात तर भेंडी ग्राहकांना 80 ते 120 रुपये किलो दराने खरेदी करावी लागत आहे. याशिवाय दुधी भोपळा, घेवडा, ढोबळी मिरची आणि गवार यांच्या किमतीतही मोठी वाढ नोंदवली गेली आहे.

घाऊक आणि किरकोळ बाजारातील फळभाज्यांचे दर 

  • आले- घाऊक बाजारात 100 ते 180 रुपये तर किरकोळ बाजारात 200 ते 280 रुपये
  • फरसबी - घाऊक बाजारात 80 ते 100 रुपये तर किरकोळ बाजारात 180 ते 200 रुपये
  • वाटाणा - घाऊक बाजारात 120 ते 160 रुपये तर किरकोळ बाजारात 220 ते 240 रुपये
  • शेवगा शेंग - घाऊक बाजारात 50 ते 70 रुपये तर किरकोळ बाजारात 100 ते 160 रुपये
  • भेंडी - घाऊक बाजारात 40 ते 80 रुपये तर किरकोळ बाजारात 80 ते 120 रुपये
  • गवार - घाऊक बाजारात 30 ते 50 रुपये तर किरकोळ बाजारात 80 ते 120 रुपये
  • ढोबळी मिरची -घाऊक बाजारात 40 ते 54 रुपये तर किरकोळ बाजारात 80 ते 100 रुपये

पालेभाज्यांची जुडीही झाली महाग

  • कोथिंबीर - घाऊक बाजारात 18 ते 30 रुपये तर किरकोळ बाजारात 50 ते 60 रुपये
  • मेथी - घाऊक बाजारात 15 ते 20 रुपये तर किरकोळ बाजारात 30 ते 40 रुपये
  • पालक - घाऊक बाजारात 16 ते 22 रुपये तर किरकोळ बाजारात 40 ते 50 रुपये
  • शेपू -  घाऊक बाजारात 20 ते 40 रुपये तर किरकोळ बाजारात 40 ते 50 रुपये

कांद्याला अखेर मिळाला चांगला भाव

एकीकडे सर्व भाजीपाला महाग होत असताना, गेल्या अनेक महिन्यांपासून मंदीचा सामना करणाऱ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. एप्रिल महिन्यापासून कांद्याचे दर कमालीचे घसरले होते, मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून कांद्याच्या दरात लक्षणीय सुधारणा झाली आहे. सध्या घाऊक बाजारात कांदा 17 ते 25 रुपये प्रति किलोने विकला जात असून, किरकोळ बाजारात त्याचा दर 40 रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. 
 


Topics mentioned in this article