अविनाश पवार, पुणे
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रातील हवामानाचे चित्र बदलले आहे. येत्या 26 जानेवारीपर्यंत राज्यातील 7 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे वेधशाळेचे हवामान तज्ज्ञ एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, थंडी कमी होऊन उकाडा आणि ढगाळ वातावरण वाढण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागांत पावसाचे ढग जमा झाले असून, प्रजासत्ताक दिनापर्यंत हवामान अस्थिर राहण्याचा अंदाज आहे.
'या' 7 जिल्ह्यांना पावसाचा इशारा
धुळे, पालघर, नाशिक, जळगाव, नंदूरबार, अहिल्यानगर, ठाणे (नाशिक लगतचा भाग) या भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
(नक्की वाचा- Badlapur News: बदलापुरात शिवसेनेच्या नगरसेवकाला भररस्त्यात बेदम मारहाण; भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल)
तापमानात वाढ आणि धुक्याचे सावट
गेल्या 48 तासांत राज्याच्या तापमानात लक्षणीय बदल झाला आहे. किमान तापमानात 2 ते 3 अंशांची वाढ झाल्यामुळे थंडी गायब झाली आहे. काही शहरांत पारा 33 ते 35 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरणामुळे पहाटेच्या वेळी दाट धुके पडण्याची शक्यता असून, याचा परिणाम वाहतुकीवर होऊ शकतो.
रब्बी पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती
हवामानातील या अनपेक्षित बदलामुळे शेतीचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे. तूर, हरभरा आणि ज्वारी या पिकांवर ढगाळ वातावरणामुळे किडींचा प्रादुर्भाव वाढू शकतो. आंबा आणि काजूच्या झाडांना सध्या मोहोर आला असून, अवकाळी पावसामुळे हा मोहोर गळण्याची किंवा त्याला बुरशी लागण्याची शक्यता आहे. उशिरा पेरणी झालेल्यामका व गहू वाढीवर उकाड्याचा विपरित परिणाम होऊ शकतो.
(नक्की वाचा- Crime News: पतीला क्रूरपणे संपवलं, नंतर मृतदेहाशेजारी पॉर्न पाहत बसली; प्रियकरासह पत्नीला अटक)
हवामान तज्ज्ञ एस. डी. सानप यांनी म्हटलं की, "बंगालच्या उपसागरातील कमी दाबामुळे आर्द्रता वाढली आहे. शेतकऱ्यांनी पावसाची शक्यता लक्षात घेऊन काढणीला आलेली पिके सुरक्षित स्थळी हलवावीत आणि कीड-रोगांच्या नियंत्रणासाठी कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने फवारणी करावी."